बोरीवली पश्चिम येथील एस व्ही रोडसह पदपथ फेरीवाल्यांकडून अडवला गेला असून या मार्गावरून पादचाऱ्यांना चालणे सोडा, वाहने चालवणेही कठीण होत आहे. रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले जात असतानाच आता या मार्गावरील आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉकही अडवून ठेवले. खाली रस्त्यावर धड चालू शकत नाही आणि वरून म्हणजे स्कायवॉकवरून चालायचे झाले तरी त्यावर फेरीवाले पथारी पसरवून बसल्याने पादचाऱ्यांना चालण्यास जागाही आता शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे बोरीवली पश्चिम दिशेला रेल्वे स्थानकाच्या परिसरात पादचाऱ्यांनी, रेल्वे प्रवाशांनी चालायचे तरी कसे असा सवाल आता केला जात आहे. (Mumbai Hawkers)
फेरीवाल्यांनी पदपथासह रस्तेही अडवल्याने…
रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास न्यायालयाने मज्जाव केला असला तरी प्रत्यक्षात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाल्यांनी विळखा घातलेलाच असून बोरीवली पश्चिम दिशेला एस व्ही रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजुला फेरीवाले जागा अडवून बसत आहेत. या फेरीवाल्यांनी पदपथासह रस्तेही अडवल्याने लोकांना चालण्यास जागा नाही. त्यामुळे याठिकाणी खरेदीला येणाऱ्या लोकांमुळे तसेच पादचाऱ्यांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. रस्त्यावर फेरीवाल्यांमुळे गर्दी होत असल्याने वाहन चालकांना धिम्या गतीने चालवावी लागत आहेत. (Mumbai Hawkers)
(हेही वाचा – Prakash Ambedkar : पवार-ठाकरेंनी मिळून सांगलीची जागा घेतली!; प्रकाश आंबेडकरांचा आरोप)
स्कायवॉक नक्की लोकांसाठी बांधले की…
रस्ते आणि पदपथावरून लोकांना चालता येणारा त्रास कमी करण्यासाठी याठिकाणी स्कायवॉक बांधण्यात आले. परंतु आता या स्कायवॉकवरही फेरीवाले बसू लागले असून सर्व फेरीवाल्यांनी यावरही आपल्या जागा अडवून ठेवत त्यावर आपले व्यवसाय थाटायला सुरुवात केले आहे. त्यामुळे स्कायवॉकवरही दोन्ही बाजुला फेरीवाले बसत असल्याने पादचाऱ्यासंह रेल्वे प्रवाशांना स्कायवॉक वरूनही चालता येत नाही. त्यामुळे स्कायवॉक नक्की लोकांसाठी बांधले की फेरीवाल्यांसाठी बांधले असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Mumbai Hawkers)
स्कायवॉकवरील नव्याने बसणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई नाही!
विशेष म्हणजे महापालिकेचे आर मध्य विभाग कार्यालय हे एस व्ही रोडवर असून या कार्यालयापासून १०० ते २०० मीटर परिसराच्या अंतरावरच सर्वांधिक फेरीवाले बसत आहेत. हे स्कायवॉक या कार्यालयाला जोडून आहे. त्यावरही फेरीवाला जागा अडवून बसू लागले आहेत. परंतु रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून या स्कायवॉकवरील नव्याने बसणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई केली जात नाही. एकप्रकारे या स्कायवॉकसह रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाल्यांना डोळ्यावर पट्टी बांधून महापालिकेचे अधिकारी व पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे. (Mumbai Hawkers)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community