पश्चिम रेल्वेने लोकल प्रवास करणा-या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. 21 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवरील 12 डब्यांच्या तब्बल 26 लोकल गाड्या या 15 डब्यांच्या होणार आहेत. यामुळे गर्दीच्या वेळी लोकलमधील आसनक्षमता 25 टक्क्यांनी वाढणार असून, प्रवाशांना थोड्या प्रमाणात का होईन गर्दीमुक्त प्रवास करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
26 अतिरिक्त 15 डब्यांच्या लोकल
पश्चिम रेल्वेवर 21 नोव्हेंबरपासून अप आणि डाऊन मार्गावरील 12 डब्यांच्या लोकलचा 15 डब्यांपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. यामध्ये जलद मार्गावरील 10 गाड्यांचा समावेश असून 16 गाड्या या धीम्या मार्गावरील आहेत. मात्र लोकलच्या फे-यांमध्ये कोणतीही वाढ करण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
(हेही वाचाः IRCTC बदलणार जेवणाचा मेनू, भारतीय रेल्वे प्रवाशांना देणार ‘ही’ खास सुविधा)
15 डब्यांच्या एकूण 132 लोकल
15 डब्यांच्या लोकल ट्रेन्समध्ये वाढ करण्यात आल्यामुळे सध्या पश्चिम रेल्वेवरील 15 डब्यांच्या लोकलची संख्या 106 वरुन 132 होणार आहे. यामुळे प्रवाशांना गर्दीतून प्रवास करण्याचा त्रास कमी होणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले आहे.
(हेही वाचाः IRCTC ने सांगितलेली ‘ही’ सोपी ट्रिक वापरा, कन्फर्म तिकीट मिळण्याची वाढेल शक्यता)
गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेची सेवा
पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी प्रवाशांच्या सोयीसाठी बदल करण्यात आले आहेत. 1986 मध्ये पश्चिम रेल्वेने 9 डब्यांच्या लोकल सेवेसह पहिल्यांदा 12 डब्यांची लोकल सेवा सुरू केली होती. त्यानंतरही लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 2009 मध्ये 15 डब्यांच्या लोकल सेवेला सुरुवात केली होती.
Join Our WhatsApp Community