15 ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरू, पण…

लसींचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करू द्यावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली होती.

दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास सुरू होणार असल्याची माहिती, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून लोकल कधी सुरू होणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. त्यातच भाजपने देखील दोन दिवसांपूर्वी लोकलसाठी आंदोलन केले होते. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन डोस घेतलेल्यांना लोकलचा प्रवास 15 ऑगस्टपासून सुरू केला जाणार असल्याची घोषणा केली.

यांना करता येणार लोकल प्रवास

  • ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल.
  • ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील.
  • ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये, तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरुन फोटो पासेस घेऊ शकतील.
  • लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू-आर कोड असतील, जेणेकरुन रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल.
  • कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

न्यायालयानेही सरकारला फटकारले!

सार्वजनिक वाहनांतील गर्दी चालू शकते, मग उपनगरीय रेल्वेप्रवासाला मज्जाव का? अशी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्याच्या निर्बंधांतील विसंगतीवर बोट ठेवले होते. मुंबई आणि अन्य शहरे यांचे स्वरुप आणि त्यांच्या आवश्यकता वेगवेगळ्या आहेत. मुंबईसाठी लोकल प्रवास महत्वाचा आहे, त्यामुळे लसींचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करू द्यावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली होती. त्यानंतर भाजप लोकल प्रवासाबाबत आक्रमक झाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here