मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन’च्या माध्यमातून पनवेल-कर्जत (Panvel-Karjat Railway )या नवीन २९ किलोमीटरच्या मार्गावरील सर्वात लांब बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या २ हजार ६२४ मीटरपैकी १ हजार मीटरचे भूमिगत खोदकाम पूर्ण झाले आहे. या मार्गामुळे सीएसएमटी ते कर्जत दरम्याचा प्रवासाचा वेळ २० मिनिटे वाचणार असल्याची माहिती ‘मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन’ने दिली आहे.
पनवेल ते कर्जत एकच रेल्वे मार्ग असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मालवाहतुकीसाठी त्याचा वापर होत असतो. कर्जत आणि पनवेलमधील प्रवासासाठी व्हाया ठाणे किंवा कुर्ला मार्गे लोकलने जावे लागते.त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी २०१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पनवेल-कर्जत रेल्वे मार्गिकेच्या प्रकल्पास हिरवा कंदील दाखवला. ‘मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन’च्या माध्यमातून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मंजुरी दिली होती. कोरोनामुळे या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामे खोळंबली.
(हेही वाचा :Clean Air Survey-2023 : नाशिकची हवा झाली प्रदूषित , स्वच्छ हवा सर्वेक्षणात नापास)
या प्रकल्पात तीन बोगदे बांधले जातील.
जानेवारी २०२१ नंतर या कामांना सुरुवात झाली. पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे मार्गिकेला २ हजार ७८३ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे.पनवेल-कर्जत यांना जोडणारा सध्या एकेरी मार्ग असून तो पनवेल, खालापूर आणि कर्जत तालुक्यातून जातो. नवा प्रस्तावित पनवेल-कर्जत मार्ग सध्याच्या मार्गाला जवळपास समांतर बांधण्यात येत आहे. नव्या मार्गावर तीन बोगदे असतील. वावर्ले हा बोगदा २,६०० मीटर लांबीचा आहे. नढालची लांबी २१९ मीटर आणि किरवलीची लांबी ३०० मीटर आहे. या बोगद्याव्यतिरिक्त दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार असून कर्जतजवळील उड्डाणपूल १,२२५ मीटर आणि पनवेललगतचा पूल १,३७५ मीटरचा आहे. मार्च २०२५ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community