पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसाठी मुंबई महापालिका जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांना जल निर्मलता राष्ट्रीय पुरस्कार सन २०१९-२० वर्षांकरता प्राप्त झाला. या राष्ट्रीय पुरस्काराने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फेब्रुवारी २०२१ रोजी सन्मानित करण्यात आले होते ,पण महापौरांनी या सर्व अधिकाऱ्यांना १८ नोव्हेंबर २०२१ रोजी सन्मानित केले. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर तब्बल ९ महिन्यांनी महापौरांना या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्याचा मुहूर्त सापडला. गुरुवारी महापौरांच्याहस्ते या सर्व अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
पाण्याच्या शुद्धतेत 99 टक्क्यांपर्यंत वाढ
प्रधानमंत्री यांच्या जलमिशन कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सूचनेनुसार ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड ( बीआयएस) यांनी सन २०१९ मध्ये दिल्ली व राजधानीच्या २० शहरांत केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्ता सर्वेक्षणात मुंबई महानगरपालिकेतर्फे पुरवठा करण्यात येणारे पाणी सर्व निकषांवर योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रयत्नपूर्वक प्राप्त केलेल्या लक्षपूर्तीची दखल घेऊन सन २०१९-२० या वर्षकरिता इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनतर्फे बृहन्मुंबई महानगरपालिकेला फेब्रुवारी २०२१ मध्ये ” जल निर्मलता राष्ट्रीय पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पाणीपुरवठ्याची सेवा देताना आवश्यकतेनुसार जुन्या जलवाहिन्या बदलणे, गळती दुरुस्ती, जलबोगदे बांधणे इत्यादी कामे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वीरित्या पार पाडली आहे.
मुंबईत पुरवठा होणाऱ्या पाण्याची गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने मुंबईतील २४ प्रभागातून व सेवा जलाशयातून दैनंदिन पाण्याचे नमुने संकलित करणे, प्रयोगशाळेमार्फत त्याची गुणवत्ता तपासणे व गुणवत्ता अहवाल वरिष्ठ आणि संबंधित विभागांना सातत्याने अवगत करणे व त्याबाबत सतत पाठपुरावा करणे याचे समन्वय साधणे हे जबाबदारीचे कार्य पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांनी पार पाडले आहे.तसेच पाणी नमुने तपासणीकरीता जलद,अचूक व अत्याधुनिक कार्यपद्धती लागू केली. प्रयोगशाळेला नॅशनल अँक्रिडिएशन बोर्ड ऑफ टेस्टिंग लॅबोरेटरी आयएसओ २०१७ चे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. सर्वांचा दृश्य परिणाम म्हणजे पाण्याच्या दर्जात्मक शुद्धतेचा मागील काही वर्षात ९९ टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे.
या अभियंता अधिका-यांचा करण्यात आला सत्कार
पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या या पुरस्कार प्राप्त अधिकाऱ्यांचा गौरव महापौरांच्याहस्ते करण्यात आला. मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा, पाण्याची गुणवत्ता व शुद्धता यावर सर्वात जास्त खर्च करते. असं याप्रसंगी बोलतांना महापौरांनी म्हटले आहे. पुढील काळात पाण्याच्या जलस्रोतांचे चांगल्या प्रकारे संवर्धन करणे गरजेचे असून निसर्गचक्राची साखळी भक्कम ठेवण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे, महापालिका उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी ) अजय राठोर उपस्थित होते. यावेळी अजय राठोर ( जल अभियंता ),संजय आर्ते ( उप जल अभियंता, सुनिल जैन ( सहाय्यक अभियंता, गुण नियंत्रण ), संतोष जठार ( महापालिका प्रयोगशाळा विश्लेषक ), अरुणा शिंदे ( दुय्यम अभियंता, गुण नियंत्रण ), वैभव घरत ( दुय्यम अभियंता , गुणनियंत्रण ) या अभियंता व अधिकारी यांना महापौरांच्या हस्ते सन्मानपत्र व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
( हेही वाचा : रस्त्यांच्या चरींच्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची भाजपची मागणी )
|