लोकलनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) आता रात्री उशिरापर्यंत प्रवास करता येणार आहे. मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वरून (अंधेरी पश्चिम आणि गुंदवली स्थानक) शेवटची मेट्रो आता रात्री १०.३० ऐवजी ११ वाजता सुटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्याने हा निर्णय घेऊन मुंबईकरांना दिवाळीची भेट दिली आहे.
या निर्णयानुसार, शनिवार (ता. ११) पासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिवाळीनिमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याबाबत सूचना केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मेट्रोची वेळ केवळ सणासाठी न वाढवता नियमितपणे वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
(हेही वाचा – Maharashtra Drought : राज्याच्या तब्बल ९५९ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर)
मुख्यमंत्री म्हणाले की, दिवाळीनिमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याची मागणी होत होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ सणासाठी नाही, तर कायमस्वरूपी मेट्रोची वेळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांना आता रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर आतापर्यंत सुमारे सहा कोटी नागरिकांनी प्रवास केला आहे. जवळपास १.६ लाख मुंबईकरांनी वन कार्ड खरेदी केले आहे. आम्ही मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता यावा यासाठी विविध उपाययोजना राबवत आहोत. आज मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याबाबतचा निर्णयही मुंबईकरांसाठी दिलासा ठरेल, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
शेवटची मेट्रो आता १०.३० ऐवजी रात्री ११ वाजता सुटणार
मुंबई मेट्रो ‘मार्ग २ अ’च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो ‘मार्ग ७’च्या गुंदवली स्थानकावरून शेवटची मेट्रो आता १०.३० ऐवजी रात्री ११ वाजता सुटणार आहे. सध्या मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिमदरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५.५५ ते रात्री १०,३० दरम्यान सुमारे २५३ सेवा साडेसात ते साडेदहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत. मेट्रोच्या वाढीव वेळेमुळे सकाळी ५.५५ ते रात्री ११ दरम्यान मेट्रोच्या २५७ फेऱ्या होतील. रात्री १० नंतर दहिसर पश्चिम ते गुंदवली आणि डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिमदरम्यान प्रत्येकी दोन अतिरिक्त मेट्रो फेऱ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
हेही पहा