महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने मुंबई मेट्रोच्या खांबांवर छोटे आणि मायक्रोसेल टेलिकॉम टॉवर्स बसवून प्रवाशांसाठी दळणवळण सेवा प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमांतर्गत, पहिले 12 खांब ‘इंडस टॉवर्स’ या आघाडीच्या दूरसंचार क्षेत्रातील पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपनीला देण्यात आले आहेत. ‘इंडस टॉवर्स’ कंपनीला आज स्वीकृती पत्र सुपुर्द करण्यात आले. ज्यामुळे पुढील दहा वर्षांत अंदाजे 1 कोटी रुपये इतका (१२ खांबांसाठी) अतिरिक्त नॉन-फेअर बॉक्स महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रवासादरम्यान नेटवर्क कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी, महा मुंबई मेट्रोने ‘लहान/सुक्ष्म दूरसंचार सेल’ धोरण तयार केले आहे. या धोरणाअंतर्गत मेट्रोमार्ग 2A आणि 7 या उन्नत मार्गावरील 35-किलोमीटर लांबीच्या मार्गावर असलेल्या 1500 खांबांवर दूरसंचार उपकरणे लावण्यासाठी परवाना देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करणे, प्रवाशांसाठी आणि आसपासच्या भागात राहणाऱ्या किंवा त्या भागातील रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी सोयीस्कर आणि अखंड दळणवळण सेवा सुनिश्चित करणे हा आहे. वरील धोरणाला अनेक टेलेकॉम कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून, महा मुंबई मेट्रो विविध इच्छुक एजन्सींसाठी मेट्रोच्या खांबांवर टेलिकॉम टॉवर्सच्या (लहान/सुक्ष्म दूरसंचार सेल’) स्थापनेचा परवाना लवकरच देईल. याअंतर्गत पुढील १० वर्षांसाठी महा मुंबई मेट्रोला तिकिटाव्यतिरिक्त येत्या १० वर्षांत सुमारे १२० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत, महामुंबई मेट्रोने पुढील 15 वर्षांसाठी 1500 कोटींचा नॉन-फेअर बॉक्स महसूल मिळवण्यात यश मिळवले आहे आणि या वरील नमूद धोरणामुळे महसुलात भर पडेल अशी अपेक्षा आहे.
Join Our WhatsApp Community