जूनमध्ये पावसाकडून अपेक्षाभंग

83

वरुणराजाने गुरुवारी मुंबई व जवळच्या परिसरात जोरदार हजेरी लावली. मुंबईतील बहुतांश ठिकाणी २०० मिमी पावसाची नोंद झाली. दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे रात्रीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुलाबा, भायखळा, वरळी, दादर, अंधेरी परिसरात २०० मिमीहून अधिक पाऊस झाला. रात्रीनंतर पावसाचा जोर कमी दिसून आला. मात्र रात्री कोसळलेल्या पावसाने मुंबईतील जून महिन्याच्या पावसाची सरासरी भरून काढली नाही. जूनच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे मुंबईकर सुखावले. संपूर्ण जून महिन्यात दादरमध्ये ४५५ मिमी पावसाची नोंद झाली.

गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर निर्माण झालेल्या द्रोणीय स्थिती (कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रकार) पावसाच्या सतर्कतेसाठी अनुकूल ठरल्याने, गुरुवारी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीत जोरदार पाऊस झाला. मात्र ही द्रोणीय स्थिती आता क्षीण होण्याची शक्यता असल्याने, शुक्रवारी मुंबईत पावसाचा जोर गुरुवारच्या तुलनेत कमी असेल.  एका दिवसाच्या पावसात मुंबईत पावसाचा मारा झाला असला तरीही सांताक्रूझ आणि कुलाबा ही दोन्ही वेधशाळेच्या केंद्रात गेल्या दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत पावसाची नोंद कमी होती. जून अखेरपर्यंत सांताक्रूझमध्ये ५३७.१ तर कुलाब्यात ५४२.३ मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात सांताक्रूझमध्ये २९१.८ आणि कुलाब्यात ३६१.४ मिमी पाऊस झाला. वातावरणीय बदल लक्षात घेत तसेच गेल्या ४९ वर्षांतील पावसाची स्थित्यंतरे पाहत यंदापासून मुंबईत जून महिन्यात अपेक्षित पावसाच्या सरासरीची आकडेवारी भारतीय हवामान खात्याने बदलली. त्यातुलनेत वेधशाळेची दोन प्रमुख केंद्र असलेल्या सांताक्रूझ आणि कुलाब्यात अपेक्षेएवढ्या पावसाची नोंद झाली नाही.

मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणांवर वेधशाळेसह पालिका आणि अग्निशमन दलानेही स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्रे बसवली आहेत. या केंद्रातील माहितीच्या आधारे खासगी हवामान अभ्यासकांच्या संकलनात केवळ दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज परिसरात चारशे मिमीहून अधिक पाऊस झाला. संपूर्ण जून महिन्यात दादरला ४५५ तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ४१९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापैकी दादरमधील पाऊस मुंबईतील इतर सर्व ठिकाणांहून जास्त होता. त्याखालोखाल केवळ कुलाब्यात तीनशेहून अधिक पावसाची नोंद झाली. कुलाब्यात ३६१.४ मिमी पाऊस झाला. बोरिवलीत २९६ पाऊस नोंदवला गेला.

( हेही वाचा: पावसाने रस्ते जलमय, वाहतूक झाली विस्कळीत )

१ जुलैच्या हवामानाचा अंदाज –

शुक्रवारी सकाळी आठ वाजता जाहीर झालेल्या अंदाजपत्रात मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने संपूर्ण भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत अतिवृष्टी होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.