मुंबईत आज मुसळधार पावसाच्या सरी

मुंबईत जूनच्या शेवटच्या दिवशी अखेरीस वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली आहे. मुंबईत सकाळपासून बहुतांश भागांत संततधार पाऊस सुरु असून, येत्या काही तासांत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने सकाळी आठ वाजता जाहीर केला आहे.

बोरिवली, मुलुंड, पवई, चेंबूर, वरळी, सांताक्रूझ, कुलाबा आदी ठिकाणी सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. यासह मुंबई महानगर परिसरात ठाणे, नवी मुंबई, कल्याणमध्येही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वेधशाळा अधिका-यांनी व्यक्त केला आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता, आपली सकाळची कार्यालयीन वेळ गाठणा-या चाकरमनी मुंबईकरांना आज सकाळी छत्रीसहच बाहेर पडावे लागणार आहे.

किमान तापमानात घट

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. बुधवारपासून संततधार कायम सुरु असल्याने गेल्या २४ तासांच्या नोंदीनुसार, सकाळी आठ वाजता सांताक्रूझ आणि कुलाबा येथे अनुक्रमे ४१.४ मिमी तर कुलाब्यात ३३.२ मिमी पावसाची नोंद झाली. परिणामी किमान तापमानातही घट नोंदवली गेली. सांताक्रुझमध्ये २४.४ तर कुलाब्यात २४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.

( हेही वाचा: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खुशखबर! १ हजार एसटी गाड्यांचे नियोजन )

आज दिवसभर ढगाळ वातावरण

सकाळी सात वाजल्यापासून दक्षिण मुंबईतील कुलाबा आणि भायखळ्यात ३.५ मिमी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ५ मिमी, सांताक्रूझ येथे १ मिमी, जुहू विमानतळ परिसरात ३ मिमी पावसाची नोंद सुरु झाली. मध्य उपनगर परिसरात गेल्या तासाभरापासून पावसाला सुरुवात झाली आहे. घाटकोपर, मरोळ विमानतळ परिसर येथे सकाळी नऊच्या सुमारास अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. आज दिवसभर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार सरी राहतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here