BMC : महापालिका प्रशासनाचा प्रताप; एक कोटीच्या मशीनसाठी प्रत्येक वर्षी एक ते सव्वा कोटींचा खर्च

1618
BMC : महापालिका प्रशासनाचा प्रताप; एक कोटीच्या मशीनसाठी प्रत्येक वर्षी एक ते सव्वा कोटींचा खर्च
  • सचिन धानजी, मुंबई

माहिम, दादर आणि प्रभादेवी या समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी शहर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून स्कीड स्टीअर लोडर मशिनची खरेदी महापालिकेच्या (BMC) वतीने करण्यात येत आहे. मात्र, या मशिनची जेवढी किंमत आहे, तेवढी आणि त्यापेक्षा अधिक किंमत ही पुढील प्रत्येक वर्षांच्या देखभाल आणि प्रचलनावर खर्च केली जाणार आहे. महापालिकेच्या नियमानुसार कोणत्याही वस्तूची जेवढी किंमत असेल त्या किंमतीच्या ८ ते १५ टक्के एवढी रक्कम ही याच्या देखभालीवर खर्च करता येते. परंतु चौपाटीवरील स्वच्छतेसाठी खरेदी केलेल्या या लोडर मशीनच्या देखभाल आणि प्रचलनाची जबाबदारी पुढील आठ वर्षांसाठी त्याच कंपनीवर सोपवली असून मशीन च्या प्रत्येक वर्षांच्या देखभाल आणि प्रचलन करता मशीनच्या किंमतीएवढीच रक्कम खर्च केली जाणार आहे. विशेष म्हणजे विद्यमान महापालिका आयुक्तांनी त्यावर डोळे बंद करून त्याला मान्यता दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या (BMC) जी उत्तर विभागातील अर्थांत माहिम, शिवाजी पार्क, दादर आणि प्रभादेवी आदी भागातील समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता करण्यासाठी स्कीड स्टीअर लोडर मशीनची मागणी झाल्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या अर्थात डीपीडीसी अंतर्गत यासाठी येणारा १ कोटी ०२ लाखांचा निधी मंजूर करून दिला. मुंबई महापालिकेच्यावतीने या समुद्र किनाऱ्याची स्वच्छता केली जात असली तरी जिल्हा नियोजन मंडळाच्यावतीने यासाठी आवश्यक मशीन खरेदी करता महापालिकेला निधी उपलब्ध करून देण्याचे कळवले. त्यानूसार, महापालिकेने या मशीनची खरेदी आणि पुढील सात वर्षांची देखभाल आणि प्रचलन आदीं करता निविदा मागवून पात्र कंपनी कडून याच्या खरेदीची प्रक्रिया राबवली.

(हेही वाचा – Har Ghar Tiranga : येत्या १३, १४ आणि १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवा; मुंबई महापालिकेचे आवाहन)

संबधित कंपनीला केले जाणार कोट्यवधी रुपये खर्च अदा

परंतु या मशीनच्या खरेदीची किंमत १ कोटी ०७ लाख रुपये एवढी आहे. या मशीनच्या खरेदीनंतर पहिल्या वर्षांचे देखभाल कंपनी हमी कालावधीत देणार असून त्याचा त्यांच्या प्रचलनचा खर्च महापालिकेला (BMC) मोजावा लागणार आहे. ही मशीन खरेदी केल्यापासून पहिल्याच वर्षांपासून प्रचलन आणि दुसऱ्या वर्षांपासून देखभाल आणि प्रचलन आदीसाठी संबधित कंपनीला कोट्यवधी रुपये खर्च अदा केले जाणार आहे.

डिपीडीसीच्या निधीतून या मशीनची खरेदी एस के ग्रुप कंपनीकडून करण्यात येत आहे. या मशीनची खरेदी किंमत १ कोटी ०७ लाख २६ हजार रुपये एवढी असून याच्या देखभाल व प्रचलनसाठी संबंधित कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे या प्रचलन व देखभालीसाठी पहिल्या वर्षी १ कोटी ०२ लाख रुपये, दुसऱ्या वर्षी १ कोटी ०७ लाख रुपये, तिसऱ्या वर्षी १ कोटी १२ लाख रुपये, चौथ्या वर्षी १ कोटी १७ लाख रुपये, पाचव्या वर्षी १ कोटी २२ लाख रुपये, सहाव्या वर्षी १ कोटी २८ लाख रुपये आणि सातव्या वर्षी १ कोटी ३३ रुपये अशाप्रकारे एकूण देखभालीसाठी ८ कोटी २४ लाख रुपये आणि मशीनची खरेदी १ कोटी ०७ लाख रुपये अशाप्रकारे एकूण विविध करांसह ९ कोटी ६९ लाख रुपये या मशीनच्या खरेदी व सात वर्षांच्या देखभाल आणि प्रचलन च्या नावावर खर्च केला जाणार आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.