मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी श्रवण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. संजीव कुमार यांची बदली महाट्रान्सकोचे सीएमडीपदी करण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जयस्वाल यांची बदली झाल्यानंतर जून २०२१मध्ये डॉ. संजीव कुमार यांची महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक झाली होती आणि प्रारंभी शहर विभागाची जबाबदारी स्वीकारलेल्या संजीव कुमार यांच्याकडे पुढे पश्चिम उपनगराची आणि आरोग्य विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी श्रवण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रवण हर्डीकर हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २००५च्या तुकडीतील असून संजीव कुमार हे २००३च्या तुकडीतील होते. श्रवण हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले आहे, तसेच पुणे येथील जनरल रजिस्ट्रेशन अँड कंट्रोलर स्टॅपचे निरिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.
(हेही वाचा – Transfer of IAS Officer : राज्यातील १० मोठ्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; १९ वेळा बदली झालेले तुकाराम मुंढे कुठे जाणार?)
मे २०२२मध्ये अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी हे सेवा निवृत्त झाल्यानंतर या जागी १९९७च्या तुकडीतील आशिष शर्मा यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेत आता अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे हे सर्वांत वरिष्ठ असून त्या १९९५च्या तुकडीतील आहेत. त्याखालोखाल अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू आहेत. त्यामुळे काकाणी यांच्या सेवा निवृत्तीनंतर डॉ. संजीव कुमार यांनी शहर विभागाऐवजी पश्चिम उपनगरासह आरोग्य विभागाची स्वत:कडे घेतली होती, परंतु आता नव्याने नियुक्त झालेल्या हर्डीकर यांना डॉ. संजीव कुमार यांच्याकडील पदभार न देता तो आशिष शर्मा यांना दिला जाईल आणि शर्मा यांच्याकडील शहर विभागाची जबाबदारी हर्डीकर यांच्याकडे दिली जाईल, असे बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community