ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे शहराला मुंबई महापालिकेच्या कोट्यातून अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा, यासाठी नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे करत असलेल्या प्रयत्नांना यश आले असून मुंबई महापालिकेकडून ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठा मंजूर झाला आहे.
ठाणे महापालिकेकडून मुंबई महापालिकेकडे पाण्याची मागणी
ठाणे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ठाणे शहराला मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन द्वारे अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. तसेच, मुंबई महापालिकेलाही यासंदर्भात चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते. पालकमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेनेही मुंबई महापालिकेकडे पाण्याची मागणी केली होती.
(हेही वाचा – … म्हणून मुंबई विमानतळ राहणार ६ तासांसाठी बंद!)
वागळे इस्टेटला या पाण्याचा पुरवठा करणार
त्यानुसार मुंबई महापालिकेने ठाण्याला १० एमएलडी अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. प्रक्रिया न केलेले हे पाणी असून ठाणे महापालिका त्यावर प्रक्रिया करून प्रमुख्याने वागळे इस्टेट परिसराला या पाण्याचा पुरवठा करणार आहे. या निर्णयाबद्दल शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिका आयुक्त चहल यांचे आभार मानले आहेत.
Join Our WhatsApp Community