महापालिकेचा मोठा निर्णय! उद्यापासून नव्हे तर १५ डिसेंबरपासून शाळा होणार सुरु

124

महाराष्ट्रातील प्राथमिक शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असला तरी मुंबईत मात्र, १५ डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मुंबईतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता मुंबईत पहिली ते सातवीच्या शाळा आता १५ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत.

शाळा सुरू होण्याचा निर्णय आणखी लांबणीवर 

मुंबई महापालिकेने ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु केली आहे. मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. त्यामुळे मुंबई महापालिकेने शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी १५ दिवस लांबणीवर टाकला आहे. मुंबई महापालिका शिक्षण विभागाकडून पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे पाठवला होता. त्या प्रस्तावावर चर्चा झाली आणि त्यानंतर मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा या उद्यापासून सुरू न करता १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे.

1 7

नाशिक पालिका १० डिसेंबरला निर्णय घेणार

मुंबई महापालिकेप्रमाणेच इतर शहरात देखील शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. नाशिक पालिका हद्दीतील शाळा सुरु करण्याचा निर्णय १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. नाशिक पालिका या संदर्भात १० डिसेंबरला निर्णय घेणार आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भातील आदेश शासनाने दिल्यानंतर शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षकांचे लसीकरण १०० टक्के पूर्ण झालेले असावे, तसेच नाशिकमधील ज्या गावात शाळात शाळा सुरू होते, तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव किती आहे, याची माहिती घेतल्यानंतरच शाळा सुरू करण्यात येईल, अशी माहिती नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

पुण्यात वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण असली तरी…

पुण्यातील महापौर मुरलीधर मोहोळ यांनी असे सांगितले की, राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या शाळा उद्यापासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल. पुण्यातील शाळांनी पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण केली असली तरी, दुसरीकडे शाळा सुरु करावी, अशी पालकांची भूमिका आहे. मात्र पुणे महापालिकेने शाळा १५ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.