महानगरपालिकेचे उपायुक्त उल्हास महाले यांचा दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनतर्फे गौरव

194

महानगरपालिकेत सेवा बजावत असताना छंद म्हणून असलेली संगीत विषयक आवड जपत संगीत क्षेत्रात मागील वीस वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे उपायुक्त (पायाभूत सुविधा)  उल्हास महाले यांना दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशन च्या वतीने “संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान” हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे.प्रसिद्ध संगीतकार तथा गायक डॉ. सलील कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

bmc1

दादासाहेब फाळके मेमोरियल फाउंडेशनचे उपाध्यक्ष तथा चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर आणि नातसूनऊ मृदुला पुसाळकर यांच्या हस्ते शनिवारी १ एप्रिल २०२३) प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर येथे समारंभ पूर्वक  महाले यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, तैलचित्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  महानगरपालिकेतील विविध अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

(हेही वाचा अखेर केंद्रीय मंत्री राणे यांना ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाचा दिलासा)

महानगरपालिकेच्या माध्यमातून कर्तव्य बजावताना जसे जसे शक्य झाले तसा तसा वेळ काढून संगीत दिग्दर्शन, सांगीतिक कार्यक्रम, लघुकथा दिग्दर्शन, पटकथा इत्यादी भूमिका बजावल्या. संगीत रचना आवड जपत १०० हून अधिक गझल, कविता उल्हास महाले यांनी लिहिल्या आहेत. सत्काराला उत्तर देताना  उल्हास (संजय) महाले यांनी नमूद केले की, संगीत ही आवड म्हणून मी कसोशीने जपली आहे. ताणतणावातून मुक्ती देणारे संगीत व्यापक व्यासपीठावर नेवून, त्या आधारे इतरांना शक्य होईल तेवढी संधी देत या क्षेत्रातही वावरतो आहे.  त्यासाठी कुटुंबाचीही मोलाची साथ मिळाली आणि संगीत व चित्रपट सृष्टीतील अनेक लहान मोठ्या व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळाली. यापूर्वीही मी निर्मिती केलेल्या “आरसा” या लघुपटाला दादासाहेब फाळके सन्मान मिळाला होता. आज चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या नावाने दिला जाणारा सन्मान दुसऱ्यांदा मिळाला, हे मी माझे भाग्य समजतो, असे भावपूर्ण उद्गार व्यक्त करत  महाले यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी पुरस्कार प्रदान करताना चंद्रशेखर पुसाळकर म्हणाले की, उल्हास (संजय) महाले यांनी महानगरपालिकेत सेवा पत्करली असली तरी त्यांनी आपली संगीत क्षेत्रातील आवड, छंद फक्त जपली नाही तर ती विकसित केली. मागील वीस वर्षांहून अधिक काळ वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांनी संगीत क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. संगीत आणि साहित्य क्षेत्रातील महाले यांचा अभ्यास अतिशय गाढा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिके सारख्या अतिशय मोठ्या संस्थेत सेवा बजावताना संगीत क्षेत्रात देखील त्यांनी तितक्याच तन्मयतेने योगदान दिले आहे. अशी उदाहरणे अतिशय दुर्मिळ असून त्यांचा सन्मान करणे हे फाउंडेशन आपले कर्तव्य समजते, त्याच भावनेतून महाले यांचा गौरव केला असल्याचे कौतुकाचे उद्गार पुसाळकर यांनी व्यक्त केले. या सन्मान सोहळ्या प्रसंगी कॅनव्हास थिएटर्स यांच्या वतीने स्वर साद हा मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम  सादर करण्यात आला. डॉ. सलील कुलकर्णी, जयदीप बगवाडकर, केतकी भावे-जोशी यांनी एकाहून एक सुरेल गीत सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, गायिका  गौतमी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.