मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवशी महापालिका आयुक्त तसेच दोन अतिरिक्त आयुक्तांनी पदभार स्वीकारण्याची घटना घडली आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे तसेच अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या जागी महापालिका आयुक्त म्हणून भुषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त म्हणून अमित सैनी व अभिजित बांगर यांनी महापालिका मुख्यालयात आपल्या पदाचा भार स्वीकारला. सैनी आणि बांगर यांनी बुधवारी सकाळी तर आयुक्त भुषण गगराणी यांनी सायंकाळी आपल्या पदाचा भार स्वीकारत महापालिकेत नवा इतिहास रचला आहे. (Mumbai Municipal Corporation)
महापालिका अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू व आश्विनी भिडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अनुक्रमे अभिजित बांगर आणि अमित सैनी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली करून त्यांच्या जागी भुषण गगराणी यांची नियुक्ती झाली. त्यानुसार, बुधवारी सकाळी अभिजित बांगर आणि अमित सैनी यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्याकडून अतिरिक्त आयुक्तपदाचा भार स्वीकारला. (Mumbai Municipal Corporation)
त्यानंतर सायंकाळी सव्वा पाच वाजता भुषण गगराणी हे पदभार स्वीकारण्यासाठी महापालिका मुख्यालयात दाखल झाले. त्यानंतर महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यामुळे एकाच दिवशी आयुक्त आणि दोन अतिरिक्त आयुक्तांनी पदभार स्वीकारत एकाच दिवशी कामाला सुरुवात केल्याने आजवरच्या महापालिकेच्या इतिहासातील ही पहिली घटना असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (Mumbai Municipal Corporation)
भुषण गगराणी यांनी पदभार स्वीकारताना अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, सह आयुक्त (विशेष) रमेश पवार, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे आदींसह महानगरपालिकेचे विविध वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. (Mumbai Municipal Corporation)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : बारामतीसाठी देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई; हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न)
गगराणी यांनी यापुर्वी भुषवलेली पदे
डॉ. भूषण गगराणी हे भारतीय प्रशासन सेवेतील सन १९९० च्या तुकडीचे अधिकारी आहेत. संपूर्ण भारतातून तिसऱ्या क्रमांकाने आणि मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण होणारे ते देशातील पहिलेच सनदी अधिकारी (आयएएस) आहेत. मुंबई महानगरपालिकेत नियुक्त होण्यापूर्वी डॉ. भूषण गगराणी मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते. तसेच त्यांच्याकडे नगरविकास, जलसंपदा आणि मराठी भाषा या विभागांची देखील जबाबदारी होती. (Mumbai Municipal Corporation)
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी (M.Com.) तसेच इतिहास या विषयातही कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M. A. History) त्यांनी संपादीत केली आहे. यासह डॉ. गगराणी यांनी नागपूर विद्यापीठातून विधी शाखेची (LLB) पदवीही संपादन केली आहे. तर लंडन येथील बर्मिंगहॅम विद्यापीठातून प्रशासन या विषयातून त्यांनी व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदवी (MBA) संपादन केली आहे. यासह मुंबई विद्यापीठातून व्यवस्थापन या विषयात त्यांनी विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी मिळविली आहे. प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर डॉ. गगराणी यांनी सुरुवातीची दोन वर्षे भूमी महसूल व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन, विकास प्रशासन या संदर्भातील कामकाज पाहिले. (Mumbai Municipal Corporation)
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे येथे युवक कल्याण आणि क्रीडा विभागाचे संचालक, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कामकाम पाहिले. त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयात उप सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे (सिडको) व्यवस्थापकीय संचालक अशा निरनिराळ्या पदांची धुरा सांभाळताना त्यांनी आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटविला. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव आणि नगर विकास विभागात प्रधान सचिव म्हणून देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली. (Mumbai Municipal Corporation)
अभिजीत बांगर यांनी यापूर्वी अशी भुषवली पदे
अभिजित बांगर हे भारतीय प्रशासन सेवेतील २००८ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅंड इकॉनॉमिक्स येथून एम. ए. (अर्थशास्त्र) ही पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादीत केली आहे. प्रशासकीय सेवेच्या प्रारंभी बांगर यांनी माणगाव (जिल्हा रायगड) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी कामकाज पाहिले. त्यानंतर जिल्हाधिकारी या नात्याने बांगर यांनी पालघर, अमरावती या जिल्ह्यांची धुरा सांभाळली. तेथून नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपूर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त ही पदे सांभाळल्यानंतर अलीकडे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून ते कामकाज पाहत होते. आपल्या प्रशासकीय कामकाजाने सातत्याने विशेष ठसा उमटविणारे बांगर यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. विशेषतः सन २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून ‘सर्वोत्तम जिल्हाधिकारी’ या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. (Mumbai Municipal Corporation)
डॉ. अमित सैनी यांनी यापदी केले होते काम
डॉ. अमित सैनी यांनी एम. बी. बी. एस. (मेडिसीन) पदवी संपादीत केली आहे. ते भारतीय प्रशासन सेवेतील सन २००७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. डॉ. सैनी यांनी प्रशासकीय सेवेची सुरुवात रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून केली. त्यानंतर बुलढाणा येथे सहायक जिल्हाधिकारी, गडचिरोली आणि नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. नागपूर येथे कार्यरत असताना विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य सचिव या पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांनी पाहिला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी या नात्याने त्यांनी गोंदिया आणि कोल्हापूर या जिल्ह्यांची धुरा सांभाळली. तसेच, मुंबई येथे विक्री कर विभागात सह आयुक्त पदावर कामकाज पाहत असताना महाराष्ट्र राज्य लॉटरी मंडळाच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी हाताळला. नंतर महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. अलीकडे ते जल जीवन अभियानाचे संचालक म्हणून कार्यरत होते. (Mumbai Municipal Corporation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community