ओशिवरा,मालाडच्या खाडीतील गाळ काढणार

मुंबई महापालिकेच्यावतीने नाल्यातील गाळ काढण्यात येत असला तरी हे नाले जिथे खाडीला मिळतात, त्या खाडीच्या पातमुखाजवळ मोठ्याप्रमाणात गाळ साचलेला आढळून येत आहे. मालाड भागात या पातमुखांजवळ जमा झालेल्या गाळामुळेच पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत नसून, परिणामी या भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे ओशिवरा आणि मालाड येथील खाडीच्या पातमुखाला जोडणाऱ्या नाल्यांमधील गाळ काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

महापालिकेच्या पजन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती

पश्चिम उपनगरातील ओशिवारा ते मालाड दरम्यानच्या परिसरातील विविध मोठे नाले व पर्जन्य जलवाहीन्यांमधील पाणी मालाड खाडीमध्ये सोडले जाते. या मोठ्या नाल्यांमधील साठलेला गाळ दरवर्षी पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यादरम्यान काढण्यात येतो. तरीही काही प्रमाणात गाळ नाल्यांमधून वाहून मालाड खाडीच्या पातमुखापर्यंत जाऊन जमा होतो. सध्या मालाड खाडीच्या पातमुखाशी साचलेल्या गाळामुळे नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाल्याने पावसाळी पाण्याचा निचरा संथ गतीने होतो. त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत वारंवार पाठपुरावा केला  जात असल्याने,  हा परिसर महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अखत्यारित येत असल्याने याबाबत महानगरपालिकेकडून महाराष्ट्र सागरी मंडळास कळवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पजन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा: ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा आरोप! आमची दिशाभूल केली… )

नाल्याचे रुंदीकरण करणार

त्यानुसार महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि तांत्रिक सल्लागार मे.आय्.आय्.टी. मुंबई यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये ठरवल्यानुसार तांत्रिक सल्लागार आय्.आय्.टी. मुंबई यांना महानगरपालिकेकडून आवश्यक ती माहीती पुरवून सर्वंकष प्रस्ताव सादर करण्याचे कळवण्यात आले आहे. त्यानुसार सल्लागार आय्.आय्.टी. मुंबई यांनी खाडीच्या पातमुखांच्या जागेची पाहणी केली. यामध्ये ओशिवारा/ मालाड खाडीमधील गाळ काढणे आणि खोलीकरण व ट्रेनिंग करण्याची कामे सुचवण्यात आली. या सल्लागार सेवेसाठी १ कोटी ६५ लाख २० हजार रुपये एवढे शुल्क सल्लागाराला देण्यात येत असून, त्यानुसार महापालिकेने आता गाळ काढून या नाल्याचे रुंदीकरण करण्याचे काम निश्चित केले असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here