BMC : इटलीत महापालिकेचे ‘मोटे’ यश, महापालिकेचे उपायुक्त ठरले आयर्नमॅन

6619
BMC : इटलीत महापालिकेचे ‘मोटे’ यश, महापालिकेचे उपायुक्त ठरले आयर्नमॅन
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिका (BMC) उप आयुक्त (परिमंडळ-३) आणि एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी इटली येथे २१ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडलेली ‘आयर्नमॅन इटली एमिलिया रोमाग्ना’ ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. एड्रियाटिक समुद्रात पोहणे, दुचाकी चालवणे आणि धावणे अशा तीन अत्यंत आव्हानात्मक प्रकारांत ही स्पर्धा पार पडली. विश्वास मोटे यांनी एकूण १५ तास २५ मिनिटे आणि ०४ सेकंदात या तीनही प्रकारांतील स्पर्धा पूर्ण करुन यश संपादन करत ‘आयर्नमॅन’ हा किताब पटकावला. या यशाबद्दल मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मोटे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

विश्वास मोटे यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये सहायक आयुक्त पदावर काम केले आहेत. तर, सध्या ते उप आयुक्त (परिमंडळ-३) आणि सहायक आयुक्त (एम पश्चिम) या पदांवर कार्यरत आहेत. दैनंदिन कामकाज पार पाडून त्यांनी हे यश संपादीत केले असून ही बाब कौतुकास्पद आहे.

(हेही वाचा – Mukhyamantri Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी ६ पुरुषांचा अनोखा प्रताप!)

शारीरिक क्षमतेचा कस लागणारी खडतर अशी स्पर्धा म्हणून आयर्नमॅन स्पर्धा ओळखली जाते आणि खूप कमी लोक यात यशस्वी होतात. २१ सप्टेंबर रोजी ‘आयर्नमॅन इटली एमिलिया रोमाग्ना’ ही स्पर्धा इटलीतील सेर्व्हिया या निसर्गरम्य परिसरात पार पडली. यात जगभरातील विविध देशांतील २ हजार ४३९ स्पर्धक सहभागी झाले होते. तर, भारतातील २८ स्पर्धकांनीही यात सहभाग नोंदवला होता. विश्वास मोटे या स्पर्धकांपैकीच एक आहेत. त्यांनी एड्रियाटिक समुद्रात पोहणे, दुचाकी चालवणे आणि धावणे हे तीनही प्रकार १५ तास २५ मिनिटे आणि ०४ सेकंदात पूर्ण करुन ‘आयर्नमॅन’ हा किताब मिळवला.

नोव्हेंबर २०२२ मध्ये गोव्यात पार पडलेल्या ‘आयर्नमॅन ७०.३’ या स्पर्धेद्वारा विश्वास मोटे यांनी या प्रवासाला सुरुवात केली होती. गोव्यातील स्पर्धेत मोटे यांनी १.९ किलोमीटर अंतर ५० मिनिटे २७ सेकंदात पोहून पूर्ण केले होते. त्यानंतर ९० किलोमीटर अंतर ३ तास ४९ मिनिटे आणि ३६ सेकंदांच्या कालावधीत दुचाकी चालवून तर २१.९ किलोमीटर अंतर २ तास २१ मिनिटे आणि ५९ सेकंद अवधीमध्ये धावून पूर्ण केले होते. (BMC)

(हेही वाचा – एकनाथ शिंदे-राज ठाकरे भेट; Uddhav Thackeray यांना शह देण्यासाठीची रणनीती?)

‘आयर्नमॅन’ किताब मिळवल्यानंतर मोटे यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, सन २०१६ पर्यंत मी शारीरिक तंदुरुस्तीकडे जास्त लक्ष दिले नव्हते. पण, त्यानंतर जॉगिंगपासून सुरुवात केली. हळूहळू त्यात शिस्तबद्धता, सातत्य आणि सचोटीच्या बळावर स्वत:ला अधिक कणखर बनवत गेलो. दृढनिश्चय, समर्पण आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ‘फिटनेस चार्ट’ तयार केला. यामुळे, स्वत:चा आत्मविश्वास दुणावल्यानंतर तंदुरुस्तीविषयक स्पर्धांमध्ये भाग घेणे सुरू केले. आज आयर्नमॅनसारखा प्रतिष्ठित गौरवापर्यंत पोहोचता आले, याचा अभिमान आहे. प्रत्येकजण आपापल्या कामकाजात खूप व्यग्र असतो. पण, या धावपळीमध्येही शारीरिक तंदुरुस्तीकडे प्रत्येकाने लक्ष द्यायला हवे. शरीर तंदुरुस्त असेल तर आपण खूप काही करू शकतो. माझ्या या यशापासून प्रेरित होऊन इतरांनीही शरीर, व्यायामाकडे लक्ष द्यावे, हीच अपेक्षा असल्याची भावनाही मोटे यांनी व्यक्त केली आहे. (BMC)

‘फिट मूव्हमेंट’चे मुख्य समन्वयक म्हणूनही मोटे कार्यरत

विश्वास मोटे हे विविध प्रशासकीय जबाबदारी सांभाळत असतानाच निरोगी आरोग्यविषयक बाबींमध्येही सक्रिय आहेत. ‘फिट मूव्हमेंट’चे मुख्य समन्वयक म्हणूनही ते कार्यरत असून लोकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबाबत जनजागृती करण्याचे काम करतात. प्रत्येकाने दररोज किमान ३० मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ शारीरिक हालचाली कराव्यात किंवा व्यायाम करावा. त्यामुळे, शारीरिक आणि मानसिक संतुलनात सुधारणा होऊन जीवनशैली सुदृढ बनते, असा विश्वास मोटे यांनी व्यक्त केला आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.