मुंबईतील जुन्या शौचालयांची दुरुस्ती तसेच पुनर्बांधणी महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली असून यातील शौचालयांच्या दुरुस्तीसाठी आता लोढा पॅटर्नचा वापर केला जाणार आहे. लोढा यांनी आपल्या प्रभागांमध्ये ज्याप्रकारे प्रत्येक कामांच्या ठिकाणी त्यावर होणारा खर्च आणि कंत्राटदाराचे नमुद करण्याची प्रथा चालवली आहे, त्याच प्रथेचा वापर आता शौचालय दुरुस्तीच्या कामांसाठी केला जाणार आहे. शौचालय दुरुस्तीच्या कामांचा खर्च हा बांधकामाच्या ठिकाणी प्रदर्शित केला जाणार असून ज्यामुळे जेवढा खर्च केला गेला आहे त्या तुलनेत तिथे काम झाले किंवा नाही हे स्थानिकांना कळेल आणि त्यानुसार कंत्राटदाराला मंजूर केलेल्या खर्चात योग्यप्रकारचे काम करून देणे भाग पडेल अशाप्रकारची पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका मुख्यालयातील वार्ताहर कक्षाला भेट दिली. यावेळी महापालिका वृत्त संकलन करणाऱ्या वार्ताहरांशी अनौपचारिक चर्चा करताना यापुढे प्रत्येक सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीच्या कामांच्या ठिकाणी होणारा खर्च हा प्रदर्शित केला जाणार आहे. ज्याद्वारे स्थानिकांना प्रत्यक्षात मंजूर केलेल्या खर्चाची रक्कम आणि त्यातुलनेत प्रत्यक्षात तिथे झालेले काम याची तुलना करून अपुरे काम झाल्यास किंवा निकृष्ट दर्जाचे काम केल्यास तक्रार करून ते बांधकाम चांगल्या दर्जाचे करून घेता येवू शकेल, असे लोढा यांनी स्पष्ट केले. मी माझ्या मतदार संघातील प्रत्येक कामांच्या ठिकाणी त्यासाठी केला जाणारा खर्च हा प्रदर्शित करतो आणि त्याबाबत तक्रार आल्यास संबंधित कंत्राटदारांकडून नागरिकांच्या सुचनेनुसार करून घेतो,असे त्यांनी सांगितले.
बाधित झोपडीधारकाला बाजारभावाच्या तिप्पट किंमत
झोपडपट्टी परिसरात शौचकुपांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात असून प्रत्येक झोपडपट्टीत आता शौचालय उभारणीसाठी जागा शिल्लक सोडलेली नसल्याने आता यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी शौचालय उभारणीच्या कामांमध्ये बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकाला बाजारभावापेक्षा तिप्पट दर देऊन त्यांना मोबादला देत जागा खाली करून घ्यावी. जेणेकरून त्या मोकळया जागांवर दोन ते तीन मजली शौचालयांची उभारणी करता येईल, अशीही सूचना त्यांनी केली आहे. मात्र, सध्याच्या मंजूर मोबदल्याच्या बदल्यात कुणीही झोपडीधारक जागा सोडायला तयार नसल्याने शौचालयांच्या उभारणीला गती मिळत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – META लवकरच थ्रेड्सची वेब आवृत्ती करणार लाँच)
प्रत्येक सामुदायिक शौचालयांची चार वेळा सफाई
मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील सामुहिक तथा सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीबरोबरच स्वच्छतेवरही भर दिला जाणार असून पूर्वीप्रमाणेच स्वच्छता करण्याची मागणी महापालिका आयुक्तांसोबत केल्यानंतर त्यांनी आता या कामाला गती दिली आहे. महापालिकेच्या के पूर्व विभागातील भाजपचे माजी नगरसेवक अभिजित सामंत यांच्या प्रभागातील बहुतांशी शौचालयांची सफाई दोन वेळा केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईतील झोपडपट्टीतील सफाई दिवसांतून चार वेळा केली जाईल,अशी माहिती लोढा यांनी केली.
प्रत्येक झोपडपट्टीतील एक रस्ता सिमेंट काँक्रिटचा
मुंबईतील उपनगरातील प्रत्येक महापालिका विभाग कार्यालयातील एका झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटीद्वारे करण्याचा प्रयत्न प्रायोगिक तत्वावर केले जाणार आहे. या सिमेंट काँक्रिटीच्या या रस्त्यावर यूटिलिटीज टाकण्याची सुविधा टाकली जाणार आहे. ज्यामध्ये झोपडपट्टीतून जाणाऱ्या प्रत्येक जलवाहिनी, विजेचे केबल्स आदी यूटिलिटी बॉक्समधून टाकून त्यामध्ये सुसुत्रता आणली जाणार आहे. तसेच प्रत्येक रस्त्याला जोडून विजेचे खांब टाकून त्याठिकाणी विजेचे दिवे लावले जातील. प्रत्येक विभाग कार्यालयातील प्रत्येकी एक झोपडपट्टी निवडून त्याप्रमाणे अशाप्रकारे अंतर्गत रस्ते व सेवा वाहिन्यांसह विजेचे दिवे बसले जाणार असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे झोपडपट्टी मुक्त मुंबई होईल किंवा हे आम्ही सांगू शकत नाही, पण झोपडपट्ट्यांमध्ये अधिकाधिक सुधारणा करण्याचा प्रयत्न राहिल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community