World Environment Day : महापालिकेचा पहिला वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल, मुंबई ठरले चौथे शहर

1062
World Environment Day : महापालिकेचा पहिला वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल, मुंबई ठरले चौथे शहर

जागतिक पर्यावरण दिनाच्या (World Environment Day) पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने पहिला ‘वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल’ प्रकाशित करण्यात आला आहे. मुंबईतील वातावरणीय बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रशासन प्रणाली बळकट करण्याच्या दिशेने महानगरपालिकेच्या वतीने अहवालाच्या माध्यमातून महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. वातावरणीय अर्थसंकल्प तयार करण्याबाबत जागतिक स्तरावर हाती घेण्यात आलेल्या सी-४० शहरे (C-40) या उपक्रमांचा मुंबईही एक भाग बनला आहे. यापूर्वी ऑस्लो, लंडन आणि न्यूयॉर्क या शहराशी संबंधित प्रशासनाकडून वातावरण अर्थसंकल्प अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. अशाप्रकारचा अहवाल प्रकाशित करणारे मुंबई हे जागतिक स्तरावरील आता चौथे शहर बनले आहे. (World Environment Day)

महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते बुधवारी ५ जून २०२४ या अहवालाचे मुंबई महानगरपालिका मुख्यालयात प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी उपआयुक्त (पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग) मिनेश पिंपळे, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. पर्यावरणाप्रती जागरुक राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नागरी संस्था या नात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकासुद्धा या जबाबदारीप्रती अत्यंत संवेदनशील आणि जागरुक आहे. वातावरण बदलाशी संबंधित पॅरिस कराराच्या अनुषंगाने पर्यावरणाशी सुसंगत राहून विविध पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे महत्वाचे आहे. वातावरणीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्यादिशेने प्रभावीपणे पुढाकार घेतला आहे, असे उद्गार अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी काढले. (World Environment Day)

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : नेदरलँड्सची नेपाळवर मात, इंग्लंड-स्कॉटलंड सामना गेला पावसात वाहून)

महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण प्रकल्प, मलनिःसारण प्रचालन, मुंबई मलनिःसारण प्रकल्प, पाणीपुरवठा प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन खात्यांचा पर्यावरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंध येतो. या विभागांमार्फत हाती घेतले जाणारे प्रकल्प किंवा राबविल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देणे, हा या वातावरणीय अर्थसंकल्पामागे प्रमुख उद्देश असल्याचे अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या कामांमध्ये तसेच प्रकल्पांमध्ये पर्यावरणपुरकता यावी या हेतूने ते सर्व पर्यावरणपूरक आहेत की नाही, हे या माध्यमातून तपासले जाईल. पर्यावरणाशी सुसंगत राहून या कामांना प्राधान्य दिले जाईल, उपआयुक्त (पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग) मिनेश पिंपळे यांनी सांगितले. (World Environment Day)

मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये (एमकॅप) वातावरणविषयक लक्ष्य निश्चित करण्यात आली आहेत. या लक्ष्यांचा महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय प्रक्रियेमध्ये समावेश होतो, हे या वातावरणीय अर्थसंकल्प अहवालात समाविष्ट करण्यात आले आहे. ही एक वार्षिक प्रक्रिया असून यामध्ये मुंबई वातावरण कृती आराखड्याशी (एमकॅप) संबंधित असलेल्या क्षेत्रांमधील प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी, धोरणे तसेच मार्गदर्शक तत्वांमध्ये वातावरणस्नेही उपाययोजनांचा अवलंब करणे या बाबींचा समावेश आहे. वातावरणीय अर्थसंकल्प अहवालाच्या माध्यमातून मुंबईशी निगडित धोरणे, कृती व अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये वातावरणीय वचनबद्धतांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल. तसेच यामुळे वातावरणपूरक उपक्रमांची अंमलबजावणी, मूल्यमापन, संनियंत्रण अधिक सक्षम करता येईल. शमन धोरणे आणि अनुकूलन उपायांद्वारे शास्त्रीय पद्धतीने उत्सर्जन कमी करण्याच्या आणि वातावरणीय लवचिकता सुधारण्याच्या दृष्टीने मुंबईसाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. वातावरणाशी संबंधित असलेल्या महानगरपालिकेच्या २० विभागांसोबत सल्लामसलत करून वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल तयार करण्यात आले आहे. (World Environment Day)

अर्थसंकल्पीय तरतूद

मुंबई महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भांडवली खर्चासाठी रु. ३१,७७४.५९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यापैकी अंदाजे १०,२२४.२४ कोटी रुपये म्हणजेच ३२.१८ टक्के रकमेच्या तरतुदी या मुंबई वातावरण कृती आराखड्याशी निगडित आहेत. वातावरण अंदाजपत्रकातील सर्वात जास्त वाटा हा नागरी क्षेत्र पूर आणि जल संसाधन व्यवस्थापन या क्षेत्रासाठी आहे. यामध्ये पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण प्रकल्प, मलनिःसारण प्रचालन, मुंबई मलनिःसारण प्रकल्प, पाणीपुरवठा प्रकल्प या खात्यांचा आणि घनकचरा व्यवस्थापन खात्यातील स्वच्छता संबंधित उपक्रमांचा समावेश होतो. वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल २०२४-२५ हा मुंबई वातावरण कृती आराखड्याच्या https://mcap.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल. (World Environment Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.