मुंबई महापालिकेचे २५ हजार वृक्ष रोपणाचे लक्ष्य!

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते तसेच अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भायखळा येथील महापौर निवासस्थानी वृक्षारोपण करण्यात आले.

मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही २५ हजार इतके वृक्षांचे रोपण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले असून चक्रीवादळामुळे विभागनिहाय वृक्षांच्या झालेल्या हानीची नोंद घेऊन या ठिकाणी देशी वाणांचे वृक्ष यावर्षी मोठ्या प्रमाणात लावण्यावर भर देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले. मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे वृक्षारोपणाचा संपूर्ण कार्यक्रम तयार करण्यात आला असून त्यापद्धतीने वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भायखळा येथील महापौर निवासस्थानी वृक्षारोपण करण्यात आले!

दरवर्षी ०५ जून हा दिवस संपूर्ण जगात पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते तसेच अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भायखळा येथील महापौर निवासस्थानी शुक्रवारी वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी, महापौर किशोरी पेडणेकर व अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते सोनचाफा व सीता अशोक या वृक्षांचे रोपण करण्यात आले. मुंबईत २०१९च्या वृक्षगणनेनुसार एकूण २९ लाख ७५ हजार २८३ इतके वृक्ष अस्तित्वात आहे. त्यापैकी रस्त्यालगतची ०१ लाख ८५ हजार ३३३ झाडे आणि उद्यानातील ०१ लाख ०१ हजार ६७ झाडे आहे.

(हेही वाचा : लस पुरवठा करणा-या ‘त्या’ कंपन्या ठरल्या अपात्र)

८९ याठिकाणी २५ हजार वृक्षांची लागवड करणार!

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांतील १०६८ भूखंडावरील २२९ उद्याने, ४३२ मैदाने, ३१८ मनोरंजन मैदाने तसेच इतर ८९ याठिकाणी (मियावाकी पद्धत वगळून) एकूण २५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. झाडे, पशुपक्षी ही नैसर्गिक साखळी असून ही साखळी टिकून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांचे रोपण होणे आवश्यक आहे. रस्त्याच्या फुटपाथवर झाडे न लावता महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मोकळी मैदाने व टेकड्या याठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्पष्ट केल. मुंबईसारख्या अधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये वाढत्या शहरी प्रदूषणामुळे विविध प्रकारच्या जीवघेण्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये पर्यावरणस्नेही वातावरण निर्मिती करणे, वृक्षारोपण जतन व संवर्धनाचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्यामार्फत करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.

आजपर्यंत २ लाख झाडांचे वृक्षारोपण

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मुंबईतील हरीत क्षेत्र वाढविण्यासाठी मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण सुरू केले असल्याचे महापौरांनी सांगितले. मियावाकी पद्धतीने ०३ लाख ६४ हजार ८१६ इतकी झाडे लावण्याचे प्रस्तावित असून त्यापैकी आजमितीपर्यंत ०२ लाख २१ हजार ४०५ इतके झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असल्याचे महापौरांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here