पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नागपुरात समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले. या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे 520 किलोमीटर अंतर आता अवघ्या 5 तासांवर येणार आहे.
( हेही वाचा : फडणवीसांच्या गाडीतून समृद्धीवर प्रवास केला, पण त्यांनी पोटातील पाणी हलू दिले नाही – मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी )
नागपूरपासून सुरू होणारा हा महामार्ग मुंबईपर्यंत 12 जिल्ह्यांतून जाणार आहे आणि अप्रत्यक्षपणे जोडले जाणारे 12 जिल्हे असे एकूण 24 जिल्हे आणि 5 महसुली विभाग या महामार्गाने जोडले जातील. समृद्धी महामार्ग 392 गावांना जोडणार आहे. तो ज्या ठिकाणी राज्य वा राष्ट्रीय महामार्गाला छेदून जाईल, त्या ठिकाणी इंटरचेंज तयार केले जात आहेत. 24 पैकी 19 इंटरचेंजच्या जवळ कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती करून त्याचे रूपांतर नवनगरात होईल. शेतीपूरक उद्योग तसेच औद्योगिक उत्पादनासाठी काही राखीव भूखंडांसह शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, मोकळे रस्ते, निवासी इमारती आदी सुविधा या नवनगरांमध्ये असतील.
टोल किती असणार?
सध्या फक्त नागपूर ते शिर्डी एवढाच रस्ता झाला असून शिर्डी ते मुंबईचे काम अद्याप सुरू आहे. समृद्धी महामार्गावरून 1 मिनिटात 2 किलोमीटर अंतर सहजपणे पार करता येईल. औरंगाबादहून शिर्डीला एक तासात जाता येईल. एक किलोमीटर अंतरासाठी 1.73 रुपये असा टोल असेल.
आजवर देशात जे ग्रीनफील्ड ऍक्सेस कंट्रोल्ड एक्स्प्रेस-वे झाले त्यापैकी राज्यातील समृद्धी महामार्ग सर्वात मोठा आहे. सध्या आग्रा-लखनऊ हा 301 किलोमीटर, यमुना एक्स्प्रेस-वे 165 किलोमीटर, हैदराबाद (ओआरआर) एक्स्प्रेस-वे 150 किलोमीटर आहे. समृद्धी महामार्गाची मुंबई ते नागपूरपर्यंतची लांबी 701 किलोमीटर आहे. शिवाय 55 हजार कोटी रुपये हा खर्चदेखील इतर एक्स्प्रेस-वेच्या तुलनेने सर्वाधिक आहे. महामार्गासाठी संपादित एकूण 400 फूट रुंद जागेमध्ये वाहनांना धावण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 3 लेन. तब्बल 50 फूट रुंदीचे दुभाजक. रस्त्याच्या दुतर्फा एक किलोमीटरच्या लांबीमध्ये एक लाख भारतीय वंशाचे वृक्ष लावले जाणार आहेत. सध्या मुंबई ते नागपूर 812 किमीसाठी कारने 15 तास, 51 लिटर डिझेल अन् 450 रुपये टोल लागतो. समृद्धी महामार्गावरून हे अंतर 701 किमी असेल. प्रवासात 3 हॉल्ट गृहीत धरून 7 ते 8 तास लागतील. अंदाजे 39 लिटर डिझेल व 1212 रुपये टोल लागेल. वेळ-इंधनही वाचेल, प्रदूषणही घटेल.
Join Our WhatsApp Community