मुंबई – नाशिक महामार्गाची (Mumbai–Nashik Expressway) खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. महामार्गावरील आसनगाव हद्दीत संथ गतीने रेल्वे ब्रिजचे काम सुरू आहे. तसेच वशिंदमध्ये चालू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. महामार्गावरील चेरपोलीघाट, शहापूर, आसनगाव ते वशिंदपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. याचा फटका रुग्णवाहिका, स्कूलबसला बसत आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीमुळे अडीच तासांच्या प्रवासाला आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.
(हेही वाचा – मद्यवाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना Excise Department चा कर्मचारी ठार; Nashik मध्ये धक्कादायक प्रकार)
८ ते १० वर्षापासून चालू आहे काम
गेल्या ८ ते १० वर्षापासून मुंबई- नाशिक मार्गमार्गचे आठ पदरी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू आहे. नाशिक, ठाणे (Thane), मुंबई (Mumbai) या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा (Traffic Jam) मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. त्यातच नाशिक वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने घातल्याने दोन्ही लेन पूर्ण जाम होत आहे.
३०० रुपये टोल देऊनही सोसावे लागतात हाल – प्रवासी अदिती मडकिकर यांनी व्यक्त केला संताप
वाहतूक कोंडीमुळे महिला प्रवाशांचे अत्यंत हाल होत आहेत. नाशिक जिल्ह्यातील एका गावात आम्हाला सकाळी १० वाजता पोहोचायचे होते. त्यासाठी मुंबईतून सकाळी ७ वाजता निघूनही आम्ही दुपारी २ नंतर नियोजित ठिकाणी पोहोचलो. महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होती. ही कोंडी कशामुळे झाली आहे, हे पाहिले असता रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एकच वाहन एका वेळी जाऊ शकत होते. दुसऱ्या बाजूला पोलिसांनी बॅरिकेटिंग केले होते. त्यामुळे वाहतूक संथ झाली होती. या रस्त्यावर प्रसाधनगृहांचीही सोय नाही. त्यामुळे महिला प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. प्रवासाला दुपटीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने ज्यांनी सोबत खाण्याचे पदार्थ घेतलेले नाहीत, त्यांनाही अडचणीच येतात. खासगी वाहनातून जाणारे बाजूच्या हॉटेलमध्ये वगैरे जेवून घेतात. जे बसने जातात, त्यांना तर थांबून रहाण्यावाचून पर्यायच रहात नाही.
या मार्गावर ३०० रुपये टोलवसुली केला जाते. एवढे असूनही वाहतूक कोंडीत अडकावे लागते. खड्डे मोठे मोठे असल्याने त्यावरून जातांना अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असा संताप नुकताच त्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या अदिती मडकिकर यांनी व्यक्त केला.
राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव नितीन करीर यांनाही याच रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. सध्या विधीमंडळाचे अधिवेशन चालू आहे. या काळात मंत्रालयात येणारे अधिकारी कसारा येथे गाड्या सोडून लोकलने मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. अशा प्रकारे सर्वांनाच या वाहतूक कोंडीमुळे अडचणी येत आहेत.
मुंबई- नाशिक महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे ठेकेदार, पोट ठेकेदार यांना मागील वर्षी ५ कोटींचा दंड केला होता. परंतु दंड वसूल न करता त्याच ठेकेदारांना अभय देण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करीत असल्याचा आरोप होत आहे. तर खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांची मात्र दमछाक होत आहे.
देवयानी फरांदे यांनी मांडली समस्या
या महामार्गाचा भिवंडी वळण रस्त्यापर्यंतचा भाग तीन यंत्रणांकडे विभागलेला आहे. हा तिढा सोडविण्यासाठी या रस्त्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे सोपवावी, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी केली. आधीच वाहतूक कोंडी, ठाणे जिल्ह्यात महामार्गालगतच्या गोदामांमुळे होणारी अवजड वाहनांची वाहतूक आदी कारणांनी या महामार्गावरून मार्गक्रमण करणे जिकिरीचे ठरले होते. यात पावसाची भर पडून महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले. पहिल्याच पावसात नाशिक-मुंबई रस्त्याची बिकट स्थिती झाली आहे. ही बाब फरांदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या अध्यक्षतेखाली ८ जुलै रोजी मंत्रालयात बैठक होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community