गेल्या दोन दिवसांपासून ब्रेकवर गेलेल्या पावसाने रविवार सकाळपासून मुंबईसह नजीकच्या परिसरात सरप्राईज देत सकाळी संततधारेसह पुनरागमन केले. पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पावसाचा जोर कायम राहील, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून दिली गेली. त्यामुळे वीकेण्ड पिकनिकला बाहेर पडणा-यांना आज छत्री, रेनकोटचा आधार घ्यावा लागल्याचे चित्र सकाळी दिसून आले.
मुंबईकरांनी लुटला पावसाचा आनंद
सकाळी सात वाजल्यापासून मुंबईतील बहुतांश ठिकाणी हलका परंतु संततधार पाऊस सुरु आहे. मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने सकाळी साडेआठच्या नोंदीत कुलाबा येथे ९.६ मिमी तर सांताक्रूझ येथे १६.२ मिमी पावसाची नोंद झाली. किनारपट्टी भागांसह अंतर्गत भागांतही पावसाची संततधार सुरु राहिल्याने रविवारचा दिवस कित्येकांनी घरात बसून पावसाचा आनंद घेतला.
वीकेण्डला पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना पावसाच्या सरींनी दिलासा दिल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत होते. पावसाचा जोर कायम राहिल्यास सायंकाळी कमाल तापमान एका अंशाने घसरेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३४.३ अंश सेल्सिअसवरुन ३३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.