पुढचा आठवडा मुंबईकरांसाठी धोक्याचा… काय आहे कारण?

पुढील आठवड्यातील बुधवारपासून सहा दिवस हे मुंबईकरांच्या दृष्टीने धोक्याचे मानले जात आहेत.

75

यंदा मान्सूनने सुरुवातीलाच दमदार हजेरी लावल्यामुळे, मुंबईकरांना जुलै महिन्यातील पावसाळ्याचा आनंद जूनमध्येच अनुभवता येत आहे. आजवर जुलै महिन्यामध्ये बरसात करणाऱ्या वरुण राजाने यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच धुंवाधार सलामी दिली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणे जलमय होऊन मुंबई महापालिकेचे नालेसफाईचे दावे फोल ठरले. मात्र, अशाचप्रकारे जर पुढील आठवड्यात मुसळधार पाऊस पडल्यास, मुंबई जलमय होण्याची भीती वर्तवली जात आहे. समुद्राला येणारी उंच लाटांची भरती आणि मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईला पूर परिस्थितीपासून कोणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे पुढील आठवड्यातील बुधवारपासून सहा दिवस हे मुंबईकरांच्या दृष्टीने धोक्याचे मानले जात आहेत.

गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट पाऊस

मुंबईत येत्या बुधवारी २३ जून रोजी सकाळी अकरा वाजता समुद्राला ४.५७ मीटर उंचीची भरती येणार आहे. त्यानंतर २८ जूनपर्यंत समुद्राला अधिक उंचीची भरती येणार आहे. मुंबईमध्ये दरवर्षी सरासरी शहरामध्ये २ हजार २९५ मिमी एवढा, तर उपनगरांमध्ये २ हजार ७०४ मिमी. एवढा पाऊस पडतो. परंतु १७ जून पर्यंत शहरामध्ये ५७५ मिमी आणि उपनगरात ८४१ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. अर्थात या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे २५ व ३१ टक्के एवढा पाऊस पडलेला आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत हा पाऊस दुप्पट आहे. सन २०२०मध्ये याच कालावधीत अनुक्रमे १५ आणि १० टक्के एवढा पाऊस पडला होता. त्यामुळे यंदा जून महिन्यातच सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे.

(हेही वाचाः नालेसफाईच्या नावावरून मुंबईकरांना कितीदा मूर्ख बनवाल!)

महापालिका यंत्रणांनी ‘जागते रहो’

पावसाची हजेरी कायम राहिल्यास मुंबईकरांना पुढील आठवडा हा धोक्याचा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली जाऊन, सध्या ज्याप्रकारे नालेसफाई न झाल्याचे आरोप विविध पक्षांच्या नगरसेवकांकडून केले जात आहेत, ते पाहता मुंबईची तुंबई होण्याची शक्यता आहे. एरव्ही जुलै महिन्यातील मोठ्या उंचीच्या भरतीची भीती असली, तरी यंदा जून महिन्यातच पावसाने सुरू केलेली फटकेबाजी मुंबईकरांच्या उरात धडकी भरवणारी आहे. त्यामुळे महापालिकेच्या साऱ्या यंत्रणांना आता पुढील आठवडा हा डोळयात तेल घालून जागता पाहरा देण्याची वेळ आली आहे.

या सहा दिवसांत मुसळधार पाऊस कोसळल्यास आहे भीती

२३ जून: वेळ- सकाळी १०.५३ वा, भरतीची उंची -४.५७ मीटर

२४ जून: वेळ- सकाळी ११.४५ वा, भरतीची उंची -४.७७ मीटर

२५ जून: वेळ- दुपारी १२.३३ वा, भरतीची उंची -४.८५ मीटर

२६ जून: वेळ- दुपारी ०१ .२३ वा, भरतीची उंची -४.८५ मीटर

२७ जून: वेळ- दुपारी ०२.१० वा, भरतीची उंची -४.७६ मीटर

२८ जून: वेळ-दुपारी ०२.५७ वा, भरतीची उंची -४.६१ मीटर

(हेही वाचाः नालेसफाई की मुंबईकरांशी ‘बेवफाई’?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.