लालबागमधील वन अविघ्न पार्क या टोलेजंग इमारतीला भीषण आग लागली आहे. या 60 मजली इमारतीच्या 19व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या आगीबाबत माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आगीचे लोळ वाढत जाऊन आता आग 25व्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
जीव वाचवण्यासाठी मारली उडी, पण…
लालबागमधल्या वन अविघ्न पार्क या इमारतीला लागलेल्या भीषण आगीमुळे इमारतीतील लोक जीव वाचवण्यासाठी उड्या घेत आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी तीस वर्षीय तरुण अरुण तिवारी याने इमारतीच्या 19व्या मजल्यावरुन उडी घेतली. पण हीच उडी त्याच्यासाठी जीवघेणी ठरली आहे. या तरुणाला जखमी अवस्थेत केइएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान इमारतीत काम चालू असताना शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
घटनास्थळी महापौर दाखल
इमारतीत अडकलेल्या ब-याच कामगारांना आणि रहिवाशांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. इमारतीत काम चालू असल्यामुळे अनेक कामगार आत अडकले होते. तसेच, इमारत नवीन असल्याने त्यात जास्त लोक वास्तव्यास नसल्याने मोठी जीवीतहानी टळली आहे. या आगीत जखमी झालेल्या लोकांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर तसेच मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल दाखल झाले असून, ते आगीची पाहणी करत आहेत.
Join Our WhatsApp Community