मुंबईत दहा वर्षांमध्ये वाढली केवळ दहा लाख झाडे: मियावकीने दिला महापालिकेला आधार

96

मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल आणि फांद्यांची छाटणी होत असल्याने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत असल्याचा दावा महापालिका करत असली तरी मागील दहा वर्षांमध्ये केवळ १० लाख झाडांचीच भर पाडण्यात त्यांना यश आले आहे. सन  २०११-१२ मध्ये जिथे महापालिकेच्या नोंदीवर १९ लाख १७ हजार ८४४ झाडे होती, तिथे आता सन २०२१-२२मध्ये एकूण झाडांची नोंद ही २९ लाख ७५ हजार २८३ एवढी आहे. त्यामुळे वर्षाला सरासरी एक लाख झाडांचे रोपण होत असल्याची माहिती मिळत असून यामध्ये मियावकी पध्दतीने लावलेल्या अडीच लाख झाडांचीच संख्या अधिक आहे.

मुंबईत अनेक झाडांची कत्तल इमारत बांधकाम तसेच पुनर्विकासांमध्ये केली जात असून एका झाडाच्या बदल्यात दोन झाडांचे रोपण करणे तसेच काही झाडे पुनर्रोपित करण्याच्या अटींवर महापालिकेच्यावतीने परवानगी देण्यात येते. परंतु प्रत्यक्षात विकासकांकडून काही झाडे ही महापालिकेची परवानगी मिळण्याच्या दृष्टीकोनातून लावली जातात. पण पुढे त्या झाडांकडे विकासक तेवढ्या काळजीपूर्वक पाहत नाहीत आणि महापालिकेचे अधिकारीही विकासकाला त्या झाडांबाबत कारवाई करण्याच्या हालचाली करत नाही. परिणामी विकासकांना परवानगी मिळाली की कशीही झाडे कापली जातात. दुसरीकडे वृक्षांचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी एक लाखांहून अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते.

महापालिकेच्या म्हणण्यानुसार, सन २०२१-२२ मध्ये रस्त्यालगत तसेच महापालिकेच्या अखत्यारित उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागांवर ४० हजार २३ वृक्षांची लागवड केली आणि सन २०२२-२३ मध्ये २५ हजार झाडे लागवडीचे लक्ष्य असल्याचे म्हटले आहे. परंतु सन  २०११-१२ आणि सन २०२१-२२ मधील झाडांची एकूण आकडेवारी पाहता दहा वर्षांमध्ये केवळ १० लाख झाडांची संख्या वाढल्याचे पहायला मिळत आहे.

( हेही वाचा: पनवेलमधील ‘या’ शाळेला मिळाला 5G सेवेचा पहिला मान )

यामध्ये मुलुंड टी वॉर्डमध्ये केवळ ८ हजार एवढीच झाडे वाढल्याचे पहायला मिळत आहे. २०११-१२ मध्ये मुलुंडमध्ये  ७६ हजार २०९ एवढी झाडे होती आणि सन २०२१-२२मध्ये या झाडांची संख्या ८४ हजार १८७ एवढी आहेत.

सध्या जी एकूण २९लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत, त्यात पश्चिम उपनगरांमध्ये १२ लाख २१ हजार ७३७ आणि पूर्व उपनगरांमध्ये १० लाख ३४ हजार ९५७ एवढी झाडे आहेत, तर शहरांमध्ये  ७ लाख १८ हजार ५८९ एवढी झाडे आहे. तर मियावकी पध्दतीने संपूर्ण मुंबईत मागील वर्षांपर्यंत २ लाख ६० हजार ४९५ एवढी झाडे लावली गेली आहेत. त्यात पूर्व उपनगरांमध्येच सव्वा दोन लाख झाडे लावली गेली आहेत. तर पश्चिम उपनगरांमध्ये ८ हजार आणि शहरांमध्ये सुमारे १५ हजार एवढी मियावकी झाडे लावली गेली आहे. त्यामुळे मियावकी पध्दतीने लावलेल्या सव्वा दोन लाख झाडे वगळल्यास संपूर्ण मुंबईत २७ लाख एवढीच झाडे असून दहा वर्षांमध्ये केवळ ८ लाख झाडे लावली गेल्याचे आकडेवारींवरून स्पष्ट केले.

  • सन २०११-१२  :एकूण झाडांची संख्या  १९ लाख १७ हजार ८४४
  • सन २०२१-२२ : एकूण झाडांची संख्या २९ लाख ७५ हजार २८३
  • मुंबईतील एकूण झाडे : २९ लाख ७५ हजार २८३
  • शहर :  ७ लाख १८ हजार ५८९
  • पूर्व उपनगरे :  १० लाख ३४ हजार ९५७
  • पश्चिम उपनगरे : १२ लाख २१ हजार ७३७
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.