चुकीच्या दिशेने वाहन चलावणाऱ्यांवर यापुढे गुन्हा दाखल होणार नसला तरी मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी सूचना मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सर्व वरिष्ठ अधिका-यांना दिली आहे. तसेच मोबाईल फोन हरवल्यास नवीन आयुक्तांनी आम्हाला या प्रकरणाची चौकशी करण्याचा आणि त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला असल्याचे, एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले.
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, मोबाईल फोन हरवल्यास हरवल्याची तक्रार दाखल करून न घेता चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पांडे यांनी पोलिसांना दिले होते. संजय पांडे यांच्या या दोन निर्णयांमुळे वाहन चालकांवर गुन्हे दाखल होऊ लागल्यामुळे अनेक वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याची लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती. कारण, त्यांना पासपोर्ट आणि व्हिसासाठी तसेच परदेशी विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज करताना समस्या निर्माण होत होत्या.
पोलीस आयुक्तांच्या अधिका-यांना सूचना
हरवलेल्या मोबाईल फोनचे गुन्हे दाखल करणे, त्याचा तपास करणे याबाबत पोलिसांमध्ये नाराजी होती. पांडे यांच्या निवृत्तीनंतर मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या उपस्थितीत गुन्हे बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना काही सूचना देत, रस्त्यावर चुकीच्या मार्गाने वाहन चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल न करता मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी, तसेच मोबाईल फोन हरवल्यास चौकशी करण्याचा आणि त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
मोबाईल फोन हरवल्यास, फोन हरवल्याचे प्रमाणपत्र, फोन चोरीला गेल्यास, चोरी किंवा जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिल्याचे, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पुढे ते असेही म्हणाले की जर कोणी वाहन चालवताना स्टंट करत असेल तर त्या व्यक्तीवर रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला जाईल. क्राइम कॉन्फरन्स (गुन्हे बैठक) ही शहर पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याला होणारी बैठक असून, या बैठकीत सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि प्रत्येक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात.
Join Our WhatsApp Community