मुंबई – पश्चिम उपनगरातील गोरेगाव पूर्व आरे कॉलनी या ठिकाणी पोलिसांनी कलम १४४ (जमावबंदीचे आदेश) लावले आहे. रविवारी रात्री गौतम नगर परिसरात मंदिराच्या कळस यात्रेदरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्यानंतर पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
पोलिसांची घटनास्थळी धाव
गोरेगाव पूर्वेतील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या गौतम नगर परिसरात असलेल्या शिवमंदिराच्या कळस यात्रेदरम्यान रविवारी रात्री दोन गटात वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन ८ते १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, जमलेल्या जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी आरे पोलिसानी गोंधळ घालणाऱ्या २५ जणांना ताब्यात घेऊन, त्यांच्याविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, परिसरात जमावबंदीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. दरम्यान या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, राखीव पोलीस दलाच्या तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community