होळी, धुलिवंदनासाठी मुंबई पोलिसांची नियमावली! पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबईसह राज्यभरात होळी, रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध भागात यंदा होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी हे सण ५ मार्च ते ११ मार्च २०२३ या कालावधीमध्ये साजरे करण्यात येणार आहेत. यामुळे मुंबई पोलिसांनी या दरम्यान विशेष नियम लागू केले आहेत. या नियमांचे पालन नागरिकांनी न केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

( हेही वाचा : यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; अनियंत्रित बस दुभाजकाला धडकली ३ जणांचा मृत्यू, १५ जखमी)

होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीदरम्यान नागरिकांनी या नियमांचे पालन करावे…

  • अश्लील शब्द किंवा घोषणांचे सार्वजनिक उच्चारण करू नये किंवा अश्लील गाणी सुद्धा बोलू नयेत.
  • हावभाव किंवा नक्कलेचा वापर करून नये. तसेच ज्यामुळे कोणाचीही प्रतिष्ठा, सभ्यता किंवा नैतिकता दुखावेल अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू, गोष्टींचे प्रदर्शन अथवा प्रसारण करू नये.
  • पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारू किंवा फेकू नये.
  • रंगीत किंवा साधे पाणी, कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे मारू किंवा फेकू नये.

अन्यथा कारवाई करणार 

अशी नियमावली मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे. या आदेशाचे कोणीही उल्लंघन केले किंवा या आदेशाचे उल्लंघन करण्यास मदत केली तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार शिक्षा केली जाणार आहे. हे आदेश व नियम ५ मार्च २०२३ ते दिनांक ११ मार्च २०२३ च्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here