‘जॉगिंग’वाल्यांवर कारवाई करायला पोलिस आले ‘धावून’! छ. शिवाजी पार्क पोलिसांची कारवाई 

राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लावण्यात आलेले असताना देखील, लोकांची रस्त्यावरील वर्दळ कमी होताना दिसत नाही. शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्यांकडून संचारबंदीचे नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत.

93

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात सायंकाळच्या वेळी वॉक करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. सुमारे ४० ते ४५ जणांना ताब्यात घेऊन त्यांना समज देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती, शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कसबे यांनी दिली.

नियम तुडवले ‘पायदळी’

कोरोनामुळे राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लावण्यात आलेले असताना देखील, लोकांची रस्त्यावरील वर्दळ कमी होताना दिसत नाही. शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्यांकडून संचारबंदीचे नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत. सायंकाळच्या वेळी शेकडोंच्या संख्येने नागरिक शिवाजी पार्क परिसरात वॉकिंग आणि जॉगिंग करताना दिसून येत आहेत. पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत असताना देखील, येथील नागरिकांवर त्याचा कुठलाही परिणाम होत नसल्यामुळे अखेर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

(हेही वाचाः मुंबईत पुन्हा रुग्णांचा, मृत्यूचा आकडा फुगला!)

४० ते ५० जणांवर कारवाई

बुधवारी सायंकाळी शिवाजी पार्क पोलिसांनी वॉकिंग करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना समज देऊन काही वेळाने सोडून दिले. वयोवृद्ध, महिला यांना जागेवर अडवून त्यांना परिस्थितीची जाण करुन देण्यात आली. त्यांना घरी जाण्याची सूचना देखील करण्यात आली. बुधवारी सुमारे ४० ते ४५ जणांना शिवाजी पार्क पोलिसांकडून ताब्यात घेऊन त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांचे नाव व पत्ते घेऊन त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे. अशी माहिती शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कसबे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.