कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेतील वाहतुकीला कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी आता पास वाटप सुरू करण्यात आले आहे.
हेमंत नगराळे यांच्या सूचना
अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्या खाजगी वाहन मालक आणि चालकांनी स्थानिक सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून, पास काढण्याच्या सूचना मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या वाहनांना मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी पास देण्यात आले होते, ते पास नवीन पास देईपर्यंत ग्राह्य धरण्यात येतील, असे आयुक्तांनी दिलेल्या सूचनेत म्हटले आहे.
(हेही वाचाः ब्रेक द चेन : काय बंद, काय सुरु? जाणून घ्या सविस्तर नियमावली!)
असे मिळतील पास
अत्यावश्यक सेवेसाठी लागणाऱ्या पासचा तपशील परिसरातील सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यलायत उपलब्ध असेल. आपले नाव,पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच अत्यावश्यक सेवेतील ओळखपत्रे इत्यादी दिलेल्या अर्जात भरुन इतर कागदपत्रांची नक्कल प्रत अर्जासोबत जोडण्यात यावी, असे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिलेल्या सूचनेत म्हटले आहे.
ब्रेक दि चेन मोहीम
राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारा कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक दि चेन या नव्या मोहिमेला राज्य शासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेनुसार, राज्यात ३० एप्रिलपर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी(पाचपेक्षा अधिक लोकांना विनाकारण एकत्र येण्यास बंदी) तसेच रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संपूर्ण संचारबंदी(नाइट कर्फ्यू) असणार आहे. या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी ५ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. या बंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा आणि त्या सेवा देणा-या कर्मचा-यांना मात्र वगळण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community