मुंबईकरांचे आर्थिक गणित कोलमडणार. कारण, सोमवार (७ ऑगस्ट) पासून मालमत्तेची ऑनलाईन नोंदणी महागणार असून आता यापुढे ऑनलाईन सेवेसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी आत्तापर्यंत ही सेवा ग्राहकांना मोफत देण्यात येत होती. मात्र, यापुढे आता मुंबईकरांना ई-नोंदणीसाठी अतिरिक्त १ हजार रुपये द्यावे लागणार आहेत. याशिवाय, ई-फायलिंग सेवा, रजा आणि परवाना करारांसाठीही अतिरिक्त ३०० रुपये मोजावे लागणार आहेत.
ही रक्कम ग्राहकांकडून दस्तएवजीकरण शुल्क म्हणून आकारण्यात येणार असल्याचे नोंदणी विभागाकडून सांगण्यात आले आहे. खरे तर कोविड काळात नोंदणी कार्यालयांमधील गर्दी टाळण्यासाठी नोंदणी विभागाने ई-नोंदणी सेवा मोफत सुरु केली होती. या प्रक्रियेमुळे मुंबईकरांना प्रत्यक्ष जाऊन व्यवहार करण्याची गरज भासत नव्हती. तसेच, सर्व नामांकित बांधकाम व्यावसायिकांनीही आपल्या ग्राहकांसाठी ई-नोंदणी सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचत होता.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आनंद गुप्ता यांनी सांगितले की, या शुल्काचा ग्राहकांवर फारसा परिणाम दिसून येणार नाही. ई-नोंदणीमुळे ग्राहकांचा वेळ वाचतोच शिवाय कार्यालयापर्यंत पोहोचण्याचा खर्चही वाचतो.
(हेही वाचा – MHADA : म्हाडाच्या सोडतीला मुहूर्त मिळेना, अर्जदार प्रतिक्षेत)
काय आहेत नवीन शुल्क?
१. ई-फायलिंग सेवा : रु. ३००
२. रजा आणि परवाना करार : रु. ३००
३. ई-नोंदणी सेवा : रु. १०००
शुल्क आकारण्यामागील कारण
नोंदणी विभागाच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना ऑनलाइन सेवा देण्यासाठी सॉफ्टवेअर, स्टोरेज, सर्व्हर आणि हार्डवेअरवर खर्च होतो. ही सेवा अविरत सुरू ठेवण्यासाठी ई-नोंदणी, ई-फायलिंग सेवा आणि रजा, परवाना करारासाठी दस्तऐवजीकरण शुल्क घेणे आवश्यक आहे. ही शुल्क आकारण्यामागील प्रमुख कारणे आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community