Mumbai Property Tax : मुंबई मेट्रो रेल्वे कंत्राटदारांकडे मालमत्ता कराची ३२६ कोटींची थकबाकी, पण इतर थकबाकीदारांकडे दुर्लक्ष

एमएमआरसीएल आणि संबंधित कंत्राटदारांमध्ये झालेल्या करारानुसार, या भूखंडाच्या वापरासंबंधीचे मालमत्ता कर भरण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. या पाचही कंत्राटदारांकडे मिळून ३२६ कोटी २२ लाख ६९ हजार ८४६ रुपयांचा मालमत्ता कर थकित आहे. (Mumbai Property Tax)

350
Mumbai Property Tax : मुंबई मेट्रो रेल्वे कंत्राटदारांकडे मालमत्ता कराची ३२६ कोटींची थकबाकी, पण इतर थकबाकीदारांकडे दुर्लक्ष

मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित कामकाज करणाऱ्या पाच कंत्राटदारांनी सुमारे ३२६ कोटी रुपयांचा मालमत्ता करभरणा न केल्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) त्यांना सात दिवसांची अंतिम नोटीस देण्यात आली आहे. या कंत्राटदारांना महानगरपालिकेने मार्च २०२४ मध्ये नोटीस जारी करत २१ दिवसांच्या आत करभरणा करण्यास यापूर्वी कळवले होते. पण या कालावधीत कंत्राटदारांनी करभरणा न केल्यामुळे आता सात दिवसांची अंतिम नोटीस जारी करण्यात आली आहे. मात्र, एका बाजुला मेट्रोच्या कंत्राटदारांविरोधात कर वसूल करण्याची कार्यवाही युध्द पातळीवर केली जात असली तरी दुसरीकडे महापालिकेचे कंत्राटदार आणि काही मोठ्या मालमत्ता कर थकबाकीदारांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. (Mumbai Property Tax)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली करनिर्धारण व संकलन विभागाच्यावतीने कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम २५ मे २०२४ आहे. मालमत्ताधारकांनी विहित मुदतीत मालमत्ता कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (Mumbai Property Tax)

(हेही वाचा – AC Government Of India : गडचिरोलीत एसी सरकारचा उन्माद; मतदान घेणे सरकारसमोर आव्हान; कुणाची आहे ही संघटना?)

मुंबई महानगरामध्ये मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमआरसीएल) वतीने मेट्रो रेल्वे प्रकल्पाची कामे सुरू आहेत. यासाठी एमएमआरसीलकडून मेसर्स सीईसी-आयटीडी, मेसर्स एल अँड टी स्टेक जेव्ही, मेसर्स डोगस सोमा, मेसर्स एचसीसी-एमएमएस-१, मेसर्स एचसीसी-एमएमएस-२ या कंत्राटदार कंपन्यांना मेट्रोचे काम करण्यासाठी वडाळा ट्रक तळ, भूकर क्रमांक ८ टप्पा २ आणि ३ याठिकाणी कास्टिंग यार्डसाठी भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (Mumbai Property Tax)

एमएमआरसीएल आणि संबंधित कंत्राटदारांमध्ये झालेल्या करारानुसार, या भूखंडाच्या वापरासंबंधीचे मालमत्ता कर भरण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. या पाचही कंत्राटदारांकडे मिळून ३२६ कोटी २२ लाख ६९ हजार ८४६ रुपयांचा मालमत्ता कर थकित आहे. महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडून वारंवार सूचना देऊनही यापैकी चार कंत्राटदारांनी आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून अद्यापर्यंत करभरणा केलेला नाही. तर, एचसीसी-एमएमसी या कंत्राटदाराकडे आर्थिक वर्ष २०१०-११ पासून मालमत्ता कर थकीत आहे. त्यामुळे, महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम २०३ नुसार, १६ मार्च २०२४ रोजी संबंधित कंत्राटदारांना २१ दिवसांच्या आत करभरणा करण्याची नोटीस जारी करण्यात आली. ही २१ दिवसांची देय मुदत १५ एप्रिल २०२४ रोजी संपुष्टात आली. (Mumbai Property Tax)

(हेही वाचा – Michael Slater in Police Custody : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल स्लेटर गंभीर आरोपांवरून पोलिसांच्या ताब्यात)

या २१ दिवसांच्या कालावधीतही त्यांनी करभरणा न केल्याने आता महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने मेसर्स सीईसी-आयटीडी, मेसर्स एल अँड टी स्टेक जेव्ही, मेसर्स डोगस सोमा यांना १५ एप्रिल २०२४ रोजी तसेच मेसर्स एचसीसी-एमएमएस-१ आणि २ यांना १६ एप्रिल २०२४ रोजी सात दिवसांची अंतिम देय मुदत नोटीस जारी करण्यात आली आहे. या सात दिवसांच्या कालावधीत कंत्राटदारांनी करभरणा न केल्यास त्यांच्यावर मालमत्तेची अटकावणी आणि जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. (Mumbai Property Tax)

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या विविध कंत्राटदारांकडे तसेच विविध आस्थापनांकडे कोट्यवधी मालमत्ता कराची थकबाकी आहे. या थकबाकीदारांकडून कराची आकारणी करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न केले जात नसून या विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक मेट्रोच्या कंत्राटदारांना टार्गेट करून प्रशासनाला आपण वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र निर्माण करत आहे. त्यामुळे मेट्रोच्या कंत्राटदारांसह महापालिकेच्या कंत्राटदार आणि इतर आस्थापनांच्या थकबाकीदारांडे दुर्लक्ष करत त्यांना अभय देण्याचा प्रयत्न करतात असे बोलले जात आहे. (Mumbai Property Tax)

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडशी संबंधित मालमत्ता कर थकबाकीदार कंत्राटदार
  • मेसर्स एचसीसी-एमएमएस – ८६ कोटी ८४ लाख ०५ हजार ६९३ रुपये.
  • मेसर्स सीईसी-आयटीडी – ८४ कोटी ४० लाख ८३ हजार ७७ रुपये.
  • मेसर्स डोगस सोमा – ८३ कोटी २३ लाख ६७ हजार ४०५ रुपये.
  • मेसर्स एल अँड टी स्टेक जेव्ही – ७० कोटी ५० लाख ४१ हजार ९०६ रुपये.
  • मेसर्स एचसीसी-एमएमएस – ०१ कोटी २३ लाख ७१ हजार ७६५ रुपये. (Mumbai Property Tax)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.