राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमधील अंतर आता अधिक कमी होणार आहे. शिवडी-न्हावाशेवा सी लिंकवरुन थेट मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जाता येणार आहे. एकूण 947 कोटी 25 लाख रुपये खर्चून हा सी लिंक तयार करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए)ने घेतला आहे. यामुळे मुंबईहून पुण्याला जाणा-या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
दोन टप्प्यांत होणार काम
नुकत्याच झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिला टप्पा चिर्ले येथील आंतरबदल व सेवा रस्त्यावर 85 कोटी 50 लाख रुपये खर्चाचा आहे. तर दुस-या टप्प्यात मुंबई-पोरबंदर प्रकल्प अर्थात शिवडी-न्हावाशेवा सी लिंकला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. या दुस-या टप्प्यासाठी एकूण 861 कोटी 75 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. यात 30 हेक्टर जमीन भूसंपादनासाठीचा 150 कोटी रुपये खर्चाचा देखील समावेश आहे.
(हेही वाचाः मालकी हक्काचे घर नाही तर मतही नाही! सफाई कामगारांनी पुकारला एल्गार)
या मार्गांचा होणार विस्तार
पोरबंदर प्रकल्पाला चिर्ले येथून राज्य महामार्ग क्रमांक 104 ला जोडण्यासाठी दीड किमी.चा 3 बाय 3 मार्गिकेचा नवीन रस्ता तयार करण्यात येणार आहे. राज्य महामार्ग क्रमांक १०४ हा चिरनेर ते गवाणपाडा असा २ बाय २ मार्गिकेचा आहे. तो पुढे पनवेल जवळ राष्ट्रीय महामार्ग ३४८ ला जोडलेला मार्ग आता ४ बाय ४ मार्गिकेचा करण्यात येणार आहे. पोरबंदर प्रकल्पावरून ये-जा करणारी वाहतूक ही राष्ट्रीय महामार्ग ३४८ वरून राष्ट्रीय महामार्ग ४८ मार्गे पुढे अडीच किमी. अंतरावर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जोडली जाते. हे रस्ते सध्या २ बाय २ असून ते आता ४ बाय ४ मार्गिकेचे करण्यात येणार आहेत.
(हेही वाचाः ‘तो’ परत जातोय!)
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक या मार्गावर वळविण्यासाठी कोण येथे आंतरबदल बांधून वाहतूक विनाअडथळा सुसाट करण्यात येणार आहे. चिर्ले येथील आंतरबदलामध्ये चार लूप आणि सेवा रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे. त्यानुसार पॅकेज ३ मध्ये दोन लुपच्या कामांचा समावेश आहे. मात्र वाहतूक सुरळीत होण्यासाठी उर्वरित दोन लूप आणि सेवा रस्ता बांधण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community