गेल्या काही वर्षांत वाढलेली वाहनांची संख्या आणि भविष्यात नवी मुंबई विमानतळामुळे आणखी वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ( Mumbai -Pune Express way)दोन्ही बाजूला प्रत्येकी एक-एक मार्गिका (लेन) वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणार असून, सध्याचा सहापदरी द्रुतगती महामार्ग अष्टपदरी करण्यासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
देशातील सर्वांत पहिला द्रुतगती महामार्ग म्हणून यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग ओळखला जातो. पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी द्रुतगती महामार्गाची रचना करण्यात आली होती. हा महामार्ग कार्यान्वित होऊन आता वीस वर्षे होऊन गेली असून, या कालावधीत या महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या कित्येक पटींनी वाढली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाची दैनंदिन क्षमता साठ हजारांच्या दरम्यान असताना, सध्या दिवसाला ऐंशी हजारपेक्षा अधिक वाहने या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळेच घाटात अनेकदा वाहतूक कोंडी होऊन तीन-साडेतीन तासांऐवजी नागरिकांना प्रवासासाठी पाच तास किंवा त्याहून अधिक कालावधी लागतो, असे वारंवार दिसून येते. महामार्गावरील कोंडी फोडण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडूनच ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तरीही, महामार्गावरून भविष्यकाळात आणखी वाहनसंख्या वाढण्याचा अंदाज असल्याने दोन्ही मार्गिकांचा विस्तार करण्याची सरकारची योजना आहे.
(हेही वाचा : Influenza : इन्फ्लुएंझापासून कसा कराल मुलांचा बचाव ?)
सहा पदरी चे आठ पदरी का ?
– पुणे ते मुंबई मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात आहे.
– मिसिंग लिंक, नवी मुंबई विमानतळ यामुळे पुण्याहून मुंबई आणि मुंबईहून पुण्याकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.
– या महामार्गावरील वाहतुकीच्या दैनंदिन क्षमतेपेक्षा ३० टक्के अधिक वाहने त्यावरून प्रवास करीत आहेत.
– क्षमतेपेक्षा अधिक वाहनांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
हेही पहा –