26th July : मुंबईकरांच्या ‘२६ जुलै’च्या आठवणींना पावसाने दिला उजाळा…

212

मुंबईसह ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांमध्ये बुधवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळू लागला. पावसाची ही संततधार दुपारी वाढून संध्याकाळपर्यंतही कायम राहिली. दुपारी दोननंतर तर ढग दाटून येत धुवाँधार पाऊस पडू लागल्याने मुंबईकरांच्या मनात पुन्हा एकदा २६ जुलैच्या आठवणी जाग्या झाल्या. नेमका २६ जुलैचाच दिवस आणि त्यातच दुपारपासून ढग दाटून आले होते. वरुण राजाने डोळे बंद करून बरसावे असा पाऊस पडत असल्याने मुंबईकरांच्या मनात पुन्हा २६ जुलैचा तो महाप्रलंय तर नाही ना अशी शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे प्रत्येकाने भीतीने कार्यालय लवकर सोडून लवकर घर गाठण्याचा प्रयत्न केला.

मुंबईत सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात  ७६.४५ मि.मी,  पूर्व उपनगरांत ५८.०१ मि.मी आणि पश्चिम उपनगरांत ७०.४३ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहर भागांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून त्याखालोखाल पश्चिम उपनगरांत पावसाची  नोंद झाली. विशेष म्हणजे सकाळपासून सायंकाळी चार वाजेपर्यंतच शहरात ६१. १९ मि.मी, पूर्व उपनगरांत ३४.५३ मि.मी आणि पश्चिम उपनगरांत ४०.६८ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली. पण त्यानंतर दोन तासांमध्ये म्हणजे सहा वाजेपर्यंत शहरांमध्ये १५ मि.मी, पूर्व उपनगरांत १४  मि.मी आणि पश्चिम उपनगरांत ३० मि.मी एवढा पाऊस पडला.

विशेष म्हणजे २६ जुलै २००५ रोजी २४ तासांमध्येच ९४४ मि.मी एवढा पाऊस संपूर्ण मुंबईत पडला होता. म्हणजेच ३७ इंच पाऊस पडला होता. १९७४ नंतरचा हा सर्वांत मोठा पाऊस होता. मिठी नदीसह सर्व नाले ओसंडून वाहत होते. समुद्राला भरती त्यात अतिवृष्टी यामुळे कुठूनही पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग नव्हता. नाल्यातील पाणी रस्त्यावर पसरून काही जागांवर सात ते आठ फुटांपर्यंत पाणी तुंबले गेले. या पाण्यात मुंबईकर अडकले, अनेक गाड्या वाहून गेल्या. गायी, म्हशी, जनावरे वाहून गेली. रेल्वे लोकल, बस गाड्या ठप्प झाल्या होत्या. मुंबईकर पाण्यात अडकले होते आणि पाण्यातून दोरीच्या सहाय्याने ते अंतर कापत होते. कोणीही त्या दिवशी घरी पोहोचले नव्हते. मिळेल तिथे आश्रय घेत मुंबईकर राहिले आणि रस्ता कापत कापत प्रत्येकाने दुसऱ्या दिवशी घर गाठले होते.

(हेही वाचा Jail : आरोपींना आजही ‘आरटीपीसीआर’ चाचणी सक्तीची अन्यथा तुरुंगात ‘नो एन्ट्री’)

२६ जुलै २००५च्या त्या महाप्रलंयकारी दिवशी दुपारी दोनपासूनच मुसळधार पाऊस कोसळू लागला आणि चार वाजेपर्यंत सर्व जनजीवनच ठप्प होऊन सर्व अडकले गेले, तर काही जण कार्यालयात अडकून पडले होते. नेमका तोच दिवस आणि मुसळधार पावसाने त्याच वेळेला जोर धरल्याने पुन्हा एकदा २६ जुलैच्या त्या महाप्रलयकारी पावसाच्या आठवणी जाग्या झाल्या. दुपारी दोन वाजताच्या सुमारास ढग दाटून येत मुसळधार पाऊस पडू लागल्याने मुंबईकरांच्या उरात धडकी भरु लागली. नेमक्या त्याच साडेतीनच सुमारास हवामान खात्याने ऑरेंज अलर्टच्या ऐवजी रेड अलर्ट जारी केल्याने ही भीती अजूनच वाढली गेली आणि अनेक शासकीय कार्यालयांसह निमशासकीय कार्यालय आणि खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांमध्ये चुळबुळ सुरु झाली. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मनात लवकर घरी जाण्याची लगबग सुरु झाली.

हवामान खात्याने २४ तासांकरता वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली. तसेच अधूनमधून वादळी वारे ४५ ते ५५ कि.मी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवली होती. त्यामुळे हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळेही लोकांच्या मनातील भीती अधिक दृढ झाली. मात्र, पावसाची संततधार असली तरी तेवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस नसल्याने तसेच पाण्याचा निचरा योग्य रितीने झाल्याने अंधेरी सब वे काही  भागांमध्ये पाणी तुंबले होते. संध्याकाळी भरती असली तरी तुंबलेल्या भागातील पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने झाल्याने अनेक भागांमध्ये २६ जुलैच्या त्या दिवसारखी पूरपरिस्थिती झाली नसली तरी प्रत्यक्षात मुसळधार पावसामुळे या जुन्या आठवणींना मात्र मुंबईकरांनी उजळणी दिल्याचे प्रत्येकाच्या चेहऱ्यांवरून दिसून येत होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.