मुंबई आणि उपनगर परिसरात गेल्या काही तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai Rain Updates) रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या सहा तासांमध्ये मुंबईत 300 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील तीन ते चार तास मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
समुद्राला मोठी भरती येणार
काही तास पाऊस कोसळत राहिल्यास मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईत सोमवारी दुपारी समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रात 4.40 मीटरच्या लाटा उसळतील. अशावेळी मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास पावसाच्या पाण्याचा निचरा होणार नाही. त्यामुळे रस्त्यांवर आणखी पाणी साचू शकते. त्यामुळे आता मुंबईकरांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे मानले जात आहेत. पुढील काही तास पाऊस सुरु राहिल्यास कामावर निघालेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागू शकतो. (Mumbai Rain Updates)
रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने
मुंबईतील मुसळधार पावसामुळे शहराची लाईफलाईन असणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर पाणी साचले होते. त्यामुळे मुंबई-ठाणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. पावसाचा जोर ओसरल्यानंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली, मात्र, ही वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मोठी गर्दी जमली आहे. (Mumbai Rain Updates)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community