जूनच्या अखेरिस अखेर वरुणाराजाने दक्षिण कोकणासह आता उत्तर कोकणावरही कृपादृष्टी दाखवली आहे. मुंबईसह कोकणातील पाचही जिल्ह्यांना मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने अतिवृष्टीसाठी सतर्क राहण्याचा इशारा देत, ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गुरुवार दुपारपासून पुण्यातील घाट परिसरांत, सातारा आणि कोल्हापूरातही येलो अलर्ट असल्याची माहिती देण्यात आली.
गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण कोकणात सतर्क झालेल्या पावसासह गुरुवार सकाळपासून मुंबई, ठाणे परिसरातही पावसाने जोर धरला आहे. पावसाचा जोर लक्षात घेत, दुपारी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने पालघरसह ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. मुंबईसह उर्वरित कोकणात पुढील दोन दिवस अतिवृष्टीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवारचा वीकेण्ड मात्र मुंबईकरांसह उत्तर कोकणवासीयांना पावसाच्या शिडकाव्यासह घालवावा लागेल.
( हेही वाचा मुसळधार सरींसह अतिवृष्टीचाही इशारा)
शुक्रवारी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत अतिवृष्टीसाठी अलर्ट कायम राहील. शनिवारी रत्नागिरी वगळता रायगड आणि सिंधुदुर्गात पावसाचा वेग काहीसा कमी झालेला असेल. दोन्ही जिल्ह्यांत अतिवृष्टीऐवजी मुसळधार पाऊस होईल, याकरिता येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रविवार – सोमवार रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात येलो अलर्ट देण्यात आला असून, रायगडात रविवारनंतर सोमवारी पाऊस होईल.
Join Our WhatsApp Community