महाराष्ट्रात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. रविवारी मुंबईतील सांताक्रूझ येथील किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. तर खासगी हवामान अभ्यासकांच्या नोंदणीत पश्चिम उपनगरातील बहुतांश स्थानकांमध्ये किमान तापमान १२ तर बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात किमान तापमान दहा अंशापर्यंत खाली घसरले. तापमानात घट नोंदवली जात असल्याने रविवारी सकाळी प्रभातफेरीसाठी बाहेर पडणा-या मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली.
( हेही वाचा : नेपाळमध्ये भीषण अपघात! ७२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले)
जानेवारीच्या पंधरवड्यात उत्तर कोकणात सुद्धा थंडी वाढली. गेल्या आठवड्यात राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली होती. परंतु थंडीच्या कडाक्याचा कोकणवासीयांना अनुभव घेता नाही आला. मुंबई, ठाणे, पालघर परिसरातही किमान तापमानात फारशी घसरण झाली नाही. मात्र वीकेण्डपासून मुंबई व नजीकच्या परिसरात सायंकाळी थंडीचे वारे वाहू लागले. परिणामी, सकाळच्या तापमानात घट होऊ लागली. दोन दिवसांपासून प्रवासादरम्यान मुंबईकरांनी स्वेटर, शाल पांघरायला सुरुवात केली आहे. दुपारनंतरही थंडीच्या प्रभावाने डोक्यावर टोपी घालूनच कित्येकांचा प्रवास सुरु होता. थंडीमुळे सायंकाळी कमाल तापमानातही घट नोंदवली जाईल. कमाल तापमान २६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरेल, असाही अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत हुडहुडणारी थंडी सोमवारीही जाणवेल, त्यामुळे सोमवारी आठवड्याची सुरुवातही थंडीसोबतच होईल. त्यानंतर हळूहळू किमान तापमान दोन अंशाने वाढत जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.