सलग तिस-या दिवशीही मुंबईत तापमान वाढ

138

मुंबईत सलग तीन दिवसांपासून कमाल तापमान ३५ अंशापुढे नोंदवले जात आहे. रविवारी मुंबईतील कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. मात्र तरी रविवारचे मुंबईचे कमाल तापमान देशातील सर्वात जास्त कमाल तापमान नसल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली.

डिसेंबरच्या पंधरवड्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने मुंबई तसेच कोकणपटट्यात हुडहुडणारी थंडी गायब आहे. राज्यातही ब-याचशा भागांत थंडीला अनुकूल वातावरण नसल्याने ऐन डिसेंबर महिन्यात मार्च-एप्रिल महिन्यातील उन्हाळी वातावरण दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात मध्य महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचेही नुकसान झाले. मुंबईतही गुरुवारी पहाटे पावसाचा शिडकावा अनुभवता आला. मंदौस चक्रीवादळाच्या प्रभावाने या भागांत बाष्प वाहून आल्याने किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी कमाल तापमान ३५.५ तर शनिवारी कमाल तापमान ३५.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. या तापमानवाढीमुळे देशभरातील सर्वात जास्त कमाल तापमानवाढ सलग दोन दिवस मुंबईत नोंदवली गेली.

सोमवारपासून कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवली जाईल, अशी आशा वेधशाळेच्या अधिका-यांनी व्यक्त केली. परंतु हुडहुडणा-या थंडीसाठी अजून थोडे दिवस वाट पाहावी लागेल, अशी माहितीही वेधशाळेच्या अधिका-यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.