मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून मुंबईला यलो अलर्ट जारी

156
मुंबईत मंगळवारी सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. सकाळपासूनच दक्षिण मुंबईत मनसोक्त कोसळणाऱ्या पावसाने आता मुंबईभरात मुसळधार सरींसह कोसळायला सुरुवात केली आहे. पावसाचा जोर वाढताच दुपारी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिवसभर मुंबईत मुसळधार पाऊस राहणार असल्याचे सांगत, यलो अलर्ट जारी केला आहे.
सकाळी सात वाजल्यापासून पावसाने दमदार सरींसह मुंबईत धोधो कोसळायला सुरुवात केली. गेल्या सहा तासांत दक्षिण मुंबईतील 40-50 मिमी पाऊस झाला आहे. परळ, हाजी अली, गिरगाव, मुंबई सेंट्रल, ग्रांट रोड या भागात सकाळपासून पावसाचा मारा सुरु आहे. परळला सहा तासांत 50.79 मिमी पाऊस झाला आहे. चेंबूरलाही 50 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यातुलनेत घाटकोपर, विद्याविहार, मरोळ परिसरात पावसाची फारशी नोंद नाही. परंतु दुपारनंतर भांडुप आणि मुलुंडपर्यंत पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता आहे.
पश्चिम उपनगरात पावसाची संततधार सुरु असताना, उत्तर पश्चिम उपनगरातील बोरिवली, दहिसर आणि मालाडला जास्त पाऊस पडला आहे. मात्र मुंबईभरात सर्वात जास्त पाऊस चिंचोली अग्निशमन केंद्रात झाला आहे. चिंचोली अग्निशमन केंद्रात 78.48 मिमी पाऊस झाला आहे.

कमाल तापमान 27 अंश सेल्सीयसवर घसरण्याची शक्यता

मुंबईत सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कमाल तापमानात दोन अंशाने घट होण्याची शक्यता आहे. मंगळवारी मुंबईतील कमाल तापमान 27 अंश सेल्सीयसवर घसरेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.