मुंबईकरांसाठी रस्त्यांवर सुरक्षित झाकणे!

104

मुंबईतील मल वाहून नेणाऱ्या वाहिन्यांवरील बीडाची व लोखंडाची अनेक झाकणे खराब झाल्याने, तसेच चोरीला जात असल्याने महापालिकेच्यावतीने नव्याने खरेदी केली जाणार आहे. यासाठी संपूर्ण मुंबईसाठी ५४५ नवीन गोलाकार तसेच चौकोनी आकाराची झाकणे खरेदी केली जाणार आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक झाकणांची मागणी ही पश्चिम उपनगरांतच सर्वाधिक आहे. पश्चिम उपनगरांसाठी ३५६ झाकणांची खरेदी केली जात आहे. पावसाळ्यात तसेच इतर वेळी या मॅनहोल्समध्ये पडून अपघात होत असल्याने आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी झाकणे बसवण्यात येणार आहेत.

९ प्रकारची झाकणे खरेदी करण्यात येत आहे

मुंबईत मोठ्या प्रमाणात रस्त्यांखालून मलवाहिनीचे जाळे पसरलेले असून या वाहिनीतील मल काढण्यासाठी त्याकरता असलेल्या मॅनहोल्सवर झाकणे बसवली जातात. वाहनांची ये-जा सुरळीत होण्यासाठी आणि यापासून होणारे अपघात टाळण्यासाठी या सर्व मलवाहिन्यांवरील गटारांची तोंडे झाकणांनी बंद करणे गरजेचे असल्याने यासाठी ९ प्रकारची झाकणे खरेदी करण्यात येत आहे. शहर भागासाठी १३५, पश्चिम उपनगरांसाठी ३५६ आणि पूर्व उपनगरांसाठी ४५ अशाप्रकारे ५४५ झाकणे खरेदी करण्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये महापालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा ३६ टक्के कमी दरांमध्ये कंत्राटदाराने बोली लावली आहे. यासाठी विविध करांसह ८८ लाख १३ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये या सर्व झाकणांचा पुरवठा केला जाणार आहे. यासाठी ए.के. कार्पोरेशन या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

(हेही वाचा गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामही लवकरच सुरु)

३ हजार रुपये कमी मोजले जाणार

विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपूर्वी एका झाकणासाठी १० हजार ८५६ रुपये एवढा दर आकारला होता. परंतु या निविदेमध्ये ९ हजार ७२ रुपये दर आकारला आहे. त्यामुळे मागील खरेदीच्या तुलनेत ६०० मि.मी. व्यासाच्या गोलाकार बीडाच्या झाकणांची खरेदी तब्बल १,८०० रुपये कमी आहे. तर ६०० मि.मी व्यासाच्या गोलाकार मृदू लोखंडी झाकणासाठी मागील खरेदीमध्ये १३ हजार ५९० रुपये खर्च करण्यात आले होते, तर यावेळी याच झाकणासाठी १० हजार ५३२ रुपये मोजले जाणार आहे. म्हणजे मागील खरेदीच्या तुलनेत ३ हजार रुपये कमी मोजले जाणार आहे. त्यामुळे विद्यमान निवड केलेल्या कंपनीच्या तुलनेत मागील वेळेस खरेदी केलेल्या आर.जी. इंडस्ट्रीज कंपनीने महापालिकेला जास्त दरात झाकणे विकली होती, असे स्पष्ट होते. याबरोबरच मागील वेळेस जयस्वाल निका इंडस्ट्रीज कंपनीकडून मोठ्या आकाराची आयताकृती लोखंडी झाकणे चौकटीसह १५ हजार ४८८ रुपयांना खरेदी केली होती, पण याच झाकणासाठी नव्याने नेमलेल्या कंत्राटदाराने १९ हजार ९९० रुपयांमध्ये खरेदी केली जात आहे. त्यामुळे मागील खरेदीपेक्षा साडेचार हजारांहून अधिक रक्कम खर्च केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.