मुंबईत लसींचा साठा पूर्ववत… दुपारी 12 पासून लसीकरण सुरू होणार

लस साठ्याच्या उपलब्धतेची ही वस्तुस्थिती पाहता, गुरुवारी २९ एप्रिल २०२१ रोजी दुसरा डोस घेण्यास पात्र असणाऱ्यांनी लसीकरणासाठी यावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.

कोविड प्रतिबंधात्मक लसीचा मुंबईत उपलब्ध असलेला साठा बुधवारी जवळपास संपुष्टात आला होता. पण बुधवारी रात्री उशिरा महापालिकेला कोविशिल्डचा साठा प्राप्त झाल्याने, गुरुवारी २९ एप्रिल २०२१ रोजी मुंबईतील महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाला दुपारी 12 पासून सुरुवात होणार आहे. खासगी केंद्रांवरील लसीकरण मात्र मर्यादित स्वरुपात असणार आहे.

महापालिकेची माहिती

बुधवारी रात्री उशिरापर्यंत काही प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा साठा प्राप्त झाल्यास गुरुवारी २९ एप्रिलला मुंबईतील शासकीय तसेच महानगरपालिका रुग्णालयातील केंद्रांवर लसीकरण सुरू राहील, असेल महापालिकेकडून सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे कोविशिल्डचा साठा रात्री उशिरा प्राप्त झाल्याने 29 एप्रिल रोजी दुपारी 12 पासून लसीकरणाला सुरुवात होईल. अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. तर ७३ पैकी ४० खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही. उर्वरित ३३ खासगी लसीकरण केंद्रांवरही मर्यादित लससाठा उपलब्ध आहे. या कारणाने तेथे दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने व लससाठा असेपर्यंतच लस देण्यात येणार आहे.

(हेही वाचाः ईशान्य मुंबईतील रुग्णांचे ‘ते’ गोल्डन अवर्स भाजप साधणार! पुरवणार ‘प्राणवायू’)

इतक्या केंद्रांवर लसीकरण

मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेंतर्गत महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे ६३ लसीकरण केंद्रे, तर खासगी रुग्णालयात ७३ अशी एकूण १३६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. मात्र, कोविड प्रतिबंधक लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने, अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने, लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेऊन दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे.

इतका साठा शिल्लक

मुंबई महानगरपालिकेला २५ एप्रिल २०२१ पर्यंत एकूण २४ लाख ५८ हजार ६०० इतक्या लसी उपलब्ध झाल्या. त्यापैकी, २४ लाख १० हजार ८६० लस उपयोगात आल्या. म्हणजेच ४७ हजार ७४० इतका लस साठा बुधवारी २८ एप्रिल २०२१ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत लसीकरणानंतर संबधित केंद्रावर शिल्लक होता.

(हेही वाचाः १ मेपासून तिसऱ्या टप्प्याचे लसीकरण नाही! आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here