कोरोनाच्या भीतीतून हळूहळू बाहेर पडणार्या मुंबईकरांनी यंदा लक्ष्मीपूजनाला कमालीची शांतता बाळगली. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत छत्रपती शिवाजी महाराज उद्याना (शिवाजी पार्क)च्या परिसरातील फटक्यांच्या आवाजाची मर्यादा १००.४ डेसिबलपर्यंत कमी राहिली. शिवाजी पार्क परिसर शांतता क्षेत्रात गणले जाते, परंतु तरीही पोलिसांच्या गैरहजेरीत रात्री दहानंतर इथे फटाके वाजवण्यास सुरुवात झाल्याचे आढळून आले.
आवाज फाऊंडेशनच्यावतीने केले मोजमाप
ध्वनीप्रदूषणाविरोधात काम करणार्या आवाज फाऊंडेशनच्यावतीने झालेल्या सर्व्हेक्षणात ही माहिती आढळून आली. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने होणार्या ध्वनीप्रदूषणाचे मोजमाप आवाज फाऊंडेशनच्यावतीने केले जाते. यंदाही मुंबईतील विविध ठिकाणी फटाक्यांमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाचे मोजमाप आवाज फाऊंडेशनने केले. यात वांद्रे, माहिम, वरळी, बाबुलनाथ, मरिन ड्राइव्ह, दादर तसेच शिवाजी पार्क परिसरातील ध्वनीप्रदूषणाचे मोजमाप झाले. या सर्व्हेक्षणातील नोंदीनुसार, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत वांद्रे, माहिम, वरळी, बाबुलनाथ, दादर, शिवाजी पार्क तसेच मरिन ड्राइव्हच्या परिसरातील ध्वनी प्रदूषण कमी झाल्याची नोंद झाली, असे आवाज फाऊंडेशनच्या संस्थापिका सुमैरा अब्दुलली म्हणाल्या.
आवाज फाऊंडेशनचे सर्व्हेक्षण
गेल्या तीन वर्षांतील दिवाळीमध्ये शिवाजी पार्क येथील ध्वनीप्रदूषणाची नोंद
वर्ष आवाजाची मर्यादा (डेसिबलमध्ये)
- २०१९ – ११२.३
- २०२० – १०५.५
- २०२१ – १००.४ (रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांची नोंद)