मुंबईत ऑक्टोबर हिटमुळे (mumbai temperature) तीव्र उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे, मात्र सध्या हवेत आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे मुंबईकरांची काहिली होत आहे. हवेत प्रदूषके साचून राहिल्यामुळे मुंबईची हवा बिघडली आहे. यामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
सोमवारी कमाल तापमान ३५ अंशापेक्षा जास्त होते. मंगळवारी तापमान एका अंशाने घसरले, तरीही मंगळवारी मुंबईकर उकाड्याने हैराण झाले. मुंबईत वातावरणातील आर्द्रता वाढली असून, कुलाबा येथे ही आर्द्रता ८० टक्क्यांच्या पुढे, तर सांताक्रूझ येथे ८० टक्क्यांच्या आसपास होती. याशिवाय हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळे हवेत प्रदूषके साचून राहिली होती. याचा परिणाम मुंबईच्या हवेवर झाल्यामुळे हवा जास्त बिघडली.
(हेही वाचा – Beauty Tips : आंघोळीच्या पाण्यात ‘या’ रसाचे थेंब मिसळा, शरीराला होतील अनेक फायदे)
कुलाबा येथे मंगळवारी ३३.२, तर सांताक्रूझ येथे ३४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील तीन दिवस मुंबईकरांना हा उकाड्याचा त्रास सहन करावा लागेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या महाराष्ट्रातून मान्सूनने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. सध्या वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून आहे. याचा परिणाम म्हणून वातावरण तापलेले आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सध्या तरी ३४ अंशांच्या खाली कमाल तापमान जाण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली.