मुंबईत बुधवार सायंकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. केवळ तीन तासात मुंबईतील भांडूप संकुलात 72.89 मिमी पाऊस झाला तर ऐरोलीत 79.1 मिमी, ऐरोलीगावात 81.7 मिमी, ठाण्यातील कोपरी येथे 93.6 मिमी तर नौपाड्यात चक्क 96.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुपारी 4 ते सायंकाळी 7 दरम्यान हा पाऊस झाला.
( हेही वाचा : सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुशासन नियमावली तयार करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश)
शुक्रवारपासून सलग चार दिवस ठाणे आणि मुंबईत मुसळधार पावसासाठी मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. सायंकाळी साडेचार वाजताच मुंबईतील बऱ्याचशा भागात विजा चमकू लागल्या होत्या. संजय गांधी उद्यानाच्या परिसरात पावसाचा जोर जास्त दिसून आला. पालिकेच्या भांडुप कार्यालयात तीन तासात 65.27 मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगर परिसरातील जंगलाच्या नजीकच्या भागातही 40 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याचे नोंदणीतून समोर आले. दहिसर अग्निशमन केंद्रात 43.18, बोरिवलीतील प्रबोधनकार नाट्य मंदिर परिसरात 56.64 मिमी, कांदिवली वर्कशॉप येथे 58.68 मिमी, मालाड अग्निशमन केंद्रात 45.72 मिमी एवढा पाऊस झाला. दक्षिण मुंबईत केवळ धारावीत जास्त पाऊस झाला. धारावीत 44.97 मिमी पावसाची नोंद झाली. अंधेरी, मरोळ, विद्याविहार, चेंबूर, देवनार, वडाळा, परळ, दादर, हिंदमाता, भायखळा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या भागात पावसाची संततधार सुरु आहे.
Join Our WhatsApp Community