मुंबई ते दुबई ड्रग्स कनेक्शन उघड!

साहिल शाह उर्फ फ्लाको हा नक्की कुठून आपला ड्रग्सचा धंदा ऑपरेट करतो याबाबत कुणालाही नक्की सांगता येत नव्हते.  मात्र एनसीबीने सुशांतसिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले ड्रग्स पेडलर्स अब्बास आणि जैद यांच्या चौकशीत फ्लाकोची माहिती समोर आली.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यु प्रकरणात ड्रग्स कनेक्शनसमोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईतील ड्रग्स माफियाचे पाळेमुळे खोदण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील ड्रग्सचे थेट कनेक्शन दुबईशी असल्याचे एनसीबीच्या कारवाईत समोर आले आहे. या धंद्यासाठी आर्थिक रसद दुबईतून पुरवली जाते. त्यामुळे मुंबईतील ड्रग्स व्यवसाय वाढला.

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात समोर आले नाव

शाहिद शहा उर्फ फ्लाको हे नाव ड्रग्सच्या धंद्यातील मोठे नाव आहे. सुशांतसिंग प्रकरणात ड्रग्स कनेक्शनसमोर आल्यानंतर फ्लाकोचे नाव समोर आले होते. सुशांतसिंग पूर्वी राहत होता त्या मालाडच्या इंटरफेस हाईटच्या ई विंगमध्येच फ्लाको राहत होता. एनसीबीने त्यावेळी त्याच्या घरावर छापा देखील टाकला त्यावेळी घरी फक्त फ्लाकोची आई होती. फ्लाको सध्या इकडे राहत नाही, तो फक्त व्हाट्सएप आणि व्हिडीओ कॉलींगच्या मार्फत संपर्कात असल्याचे आईने सांगितले होते.

फ्लाकोच्या दोन पेडलर्सला अटक

एनसीबीने काही दिवसांपूर्वी परळ व्हिलेज येथून सिद्धार्थ आणि गणेश शोरे या दोघांना अटक करण्यात आली होती. हे दोघे साहिल शाह उर्फ फ्लाकोच्या सांगण्यावरून मुंबईत ड्रग्सची विक्री करीत होते. मुंबईतील अनेक पेडलर्स यांनी फ्लाकोला प्रत्यक्षात बघितले देखील नसून तो कुठे आहे, कुठून ऑपरेट करतो, याबाबतची माहिती अटक करण्यात आलेल्या दोघांना देखील नाही. फ्लाको हा ऑर्डर मिळेल त्याप्रमाणे ड्रग्सचे पार्सल एका ठिकाणी पाठवतो, पेडलर्सने पार्सल कलेक्ट करून ते ग्राहकापर्यंत पोहचवण्याचे काम करायचे, अशी फ्लाकोच्या कामाची पद्धत आहे. या ड्रग्सची ऑर्डर फ्लाकोला डार्कनेटच्या माध्यमातून मिळते, अशी ही माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा : कोरोनाचा कहर : लाट लवकर ओसरली नाही, तर कब्रस्तानातही जागा अपुरी पडेल! )

त्याला डीवायएसपी व्हायचे होते!

एनसीबीने परळ येथून अटक केलेल्या दोघांपैकी गणेश शोरे हा एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. त्याला एमपीएससी पास करून डीवायएसपी (पोलीस उपधीक्षक) बनायचे होते अशी माहिती त्याच्या चौकशीत समोर आली असल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

…आणि फ्लाको दुबईत असल्याचे कळले!

साहिल शाह उर्फ फ्लाको हा नक्की कुठून आपला ड्रग्सचा धंदा ऑपरेट करतो याबाबत कुणालाही नक्की सांगता येत नव्हते.  मात्र एनसीबीने सुशांतसिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले ड्रग्स पेडलर्स अब्बास आणि जैद यांच्या चौकशीत फ्लाकोची माहिती समोर आली. फ्लाको हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्यावर मुंबईत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर तो दुबईत पळून गेला होता व तेथून त्याने ड्रग्सच्या धंद्यात शिरकाव केला. फ्लाको हा मुंबईतूनच ड्रग्स खरेदी करून डार्कनेट च्या माध्यमातून भारतात ऑनलाइन ड्रग्स विक्रीकरीत होता. पलावा शेती प्रकरणात फ्लाको एनसीबीने डोंबिवलीतील पलावा सिटी या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये छापा टाकून फ्लॅटमध्ये गांजाची शेती उगवणाऱ्या दोघांना अटक केली होती. त्यात एक मरीन इंजिनियर असून हायड्रोपोनिक विडची शेतीचा तज्ञ आहे. या शेतीसाठी लागणारी आर्थिक रसद दुबईत बसलेला रेहान हा पुरवत असून फ्लाको हा रेहानच्या संपर्कात असल्याचा संशय एनसीबीला आहे. फ्लाको हा रेहानच्या मार्फत पलावा सिटीच्या फ्लॅटमध्ये उगवणारा गांजाची खरेदी करून इतर ग्राहकांना पुरवत असल्याचा संशय एनसीबीला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here