Mumbai-Goa Highway : डिसेंबरपर्यंत मुंबई ते गोवा सुसाट !

गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेनचे काम पूर्ण होणार - रवींद्र चव्हाण

261
Mumbai-Goa Highway : डिसेंबरपर्यंत मुंबई ते गोवा सुसाट !
Mumbai-Goa Highway : डिसेंबरपर्यंत मुंबई ते गोवा सुसाट !

कोकणच्या भविष्याची दिशा ठरविणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात विकासाची रखडलेली कामे वेगाने मार्गी लागत आहेत. ५५० किमी लांबीच्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगवेगळ्या १० टप्प्यांमध्ये (पकेज) सुरू आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. कशेडी आणि परशुराम घाटात काम वेगाने सुरू आहे. गणेश चतुर्थीच्या आधी सिंगल लेन कोणत्याही परिस्थितीत पूर्ण व्हावा, या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि खात्री आहे, की यात आम्हाला १०० टक्के यश मिळेल.

(हेही वाचा – IND Vs IRE : ऋतुराजचे अर्धशतक, रिंकू सिंहची आक्रमक खेळीने भारताची 185 धावांपर्यंत मजल)

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध अडचणी येत होत्या. त्यात गुंतून न पडता कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर आम्ही भर दिला. आधीचे कंत्राटदार, आता नव्याने आलेले कॉन्ट्रॅक्टर्स आणि अधिकारी वर्ग यांच्यात समन्वय घडवून काम केले जात आहे. बँकांच्या बाबतीतही बऱ्याच समस्या जाणवत आहेत. बँक जे पैसे वितरित करते, ते पहिल्या कॉन्ट्रॅक्टरला जातात. प्रत्यक्षात काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला थेट पद्धतीने मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये समन्वय राखून, त्यांच्या सर्व अडचणी सोडवून काम पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. या महामार्गाच्या कामासाठी अत्यावश्यक असलेल्या वनविभाग, भूसंपादन, न्यायलयीन, तसेच अन्य बाबींच्या परवानग्यांची कार्यवाही पूर्ण झाली असून, डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत १०० टक्के काम पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

मुंबई-गोवा महामार्गाची भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी आहे. मुसळधार पावसात रस्त्याचे काम करता येत नाही. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून, सिमेंट ट्रीटेड बेस (सीटीबी) या अत्याधुनिक  तंत्रज्ञानाचा वापर करुन काम सुरू करण्यात आले आहे. या महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांपैकी पहिल्या ४२ किलोमीटरच्या टप्प्यात २३ किलोमीटर सिंगल लेनचे काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील उर्वरित काम, तसेच कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील काम नवीन मशिनरींच्या साह्याने जलदगतीने सुरू आहे. ९ मीटर पेवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दिवसाला जवळपास ९०० मीटरचे काम होत आहे. सद्यस्थितीला मुंबई -गोवा महामार्गावर पहिल्या पॅकेजमध्ये २ पेवर मशीन्स कार्यरत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एका मार्गिकेचे काम पूर्ण होवून ती खुली करता येईल. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होईल.

रायगड जिल्ह्यातील जे काम प्रलंबित आहे, ते पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने नवीन सीटीबी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. येत्या काळात देशभरातून आणखी ८ ते १० मशीन उपलब्ध करून देण्यात येतील. रायगड जिल्ह्यातील महामार्गाचा भाग काही दिवस जड वाहनांसाठी बंद केला, तर जलदगतीने काम करता येईल. त्या दृष्टीकोनातून पाली, निजामपूर मार्गे वाहतूक वळवण्याबाबत विचार सुरू आहे.

कशेडी घाट ते पोलादपूर अंतर १० मिनिटांवर

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा गणेशोत्सवात वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या बोगद्यांचे काम सुरू आहे. त्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले असून, आतील रस्त्याचे काँक्रेटीकरण सुरू आहे. काँक्रीट रस्त्याला पाणी लागल्यास सिमेंट वाहून जाऊन रस्ता खराब होतो, त्याचा दर्जा ढासळतो. ही बाब लक्षात घेता नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. नव्या बोगद्यामुळे कशेडी घाट ते पोलादपूर हे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार करता येणार आहे.

(लेखक महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत.)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.