वॉटर टॅक्सी सुरू होण्याची अनेकजण वाट पाहत आहेत. १ नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा अशी वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे. वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. दिवसाला ६ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
( हेही वाचा : पावसाळा संपला! १ नोव्हेंबरपासून कोकणातील सर्व गाड्या धावणार नव्या वेळेत; पहा वेळापत्रक)
वॉटर टॅक्सीचे भाडे किती असेल?
मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ४०० रुपये दर आकारण्यात येणार आहे. नयनतारा शिपिंग कंपनीचे संचालक रोहित सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची सोय लक्षात घेऊन ही वॉटर टॅक्सी तयार करण्यात आली आहे. यातून जवळपास २०० प्रवासी एकाचवेळी प्रवास करू शकतील. तसेच या टॅक्सीमध्ये एसीची सुद्धा सुविधा असेल.
१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वॉटर टॅक्सीचे बुकिंग २९ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. सुरूवातीच्या काळात टॅक्सी सेवा सकाळी १०.३० पासून मुंबई क्रूझ टर्मिनलवरून उपलब्ध होईल. प्रवाशांच्या प्रसिसादानुसार या वेळेत बदल केला जाऊ शकतो. गेट वे ऑफ इंडियावरून टॅक्सी सेवा सुरू झाल्यानंतर सकाळी ८.३० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत ही सेवा सुरू राहिल.
वॉटर टॅक्सीचे फिचर्स
- भारतातील पहिली हायस्पीड वॉटर टॅक्सी असून यामध्ये २०० प्रवासी क्षमता आहे.
- यामध्ये आंतरराष्ट्रीय सर्व नियमांची पूर्तता करण्यात आलेली आहे. पावसाळ्यामध्येही ही वॉटर टॅक्सी सेवा सुरू राहणार आहे. ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत ज्यामुळे कॅप्टनला सगळीकडे लक्ष ठेवता येईल.
- या वॉटर टॅक्सीमध्ये ६ व्हॅक्यूम टॉयलेट्स सुद्धा बसवण्यात आले आहे. आगीसारख्या घटना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अंतर्गत स्प्रिंकलर्स लावण्यात आलेले आहेत. तसेच प्रत्येक ठिकाणी स्मोक डिटेक्टर लावले आहेत.