अशी होत आहे कॉलसेंटरमुळे ई-चलानची वसुली!

गेल्या २४ दिवसांत नियम मोडणा-या २ हजार ५९३ चालकांनी १ कोटी १२ लाख २२ हजार २५० रुपये दंड भरला आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर ई-चलानच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. पण तरीही काही नागरिक दंडाची रक्कम भरत नसल्यामुळे वाहतूक विभागाने कठोर पावले उचलत, ट्रॅफिक कॉल सेंटरची निर्मिती केली. या कॉल सेंटरच्या माध्यमातून वाहतूक विभागाने आता कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

चांगली सुरूवात

ई-चलान पाठविलेल्या वाहन चालकांकडून वाहतूक पोलिसांनी १ कोटी रुपयांहून अधिक दंडाची वसूली केली आहे. या वसुलीसाठी विभागाने नुकतेच कॉल सेंटर सुरू केले असून, त्याचे कामकाज ७ डिसेंबर २०२० रोजी सुरू झाले आहे. वाहतूक विभागाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार या कॉल सेंटरमार्फत केल्या गेलेल्या कारवाईमुळे, गेल्या २४ दिवसांत नियम मोडणा-या २ हजार ५९३ चालकांनी १ कोटी १२ लाख २२ हजार २५० रुपये दंड भरला आहे. अशा एकूण २९ लाख ई-चलान्समार्फत वाहतूक विभागाला एकूण ३१७ कोटी रुपयांची दंडवसुली करायची आहे. त्यामानाने सध्या वसूल करण्यात आलेल्या दंडवसुलीचा आकडा कमी असला तरी, या कॉल सेंटरच्या माध्यमातून झालेली ही चांगली सुरूवात आहे, असे अधिका-यांचे म्हणणे आहे.

अशी होते कारवाई

पारदर्शकता आणि आरोप-प्रत्यारोप टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी सुमारे चार वर्षांपूर्वी ई-चलानद्वारे दंडवसुली सुरू केली होती. ई-चलानद्वारे नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी, त्यांच्या मोबाईल फोनवर दंडाची पावती पाठवण्यात येते. या आकारणीसाठी सिग्नल्सवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचा वापर केला जातो. असे ई-चलान मिळाल्यानंतर बरेच नागरिक दंड भरण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे अशा नागरिकांना या कॉल सेंटरच्या माध्यमातून संपर्क करण्यात येऊन, दंडाची रक्कम भरण्यास सांगण्यात येते.

(हेही वाचा: आता भारतीय नौदलाची ‘ड्रोन’दृष्टी!)

आतापर्यंत २४ कॉल सेंटर कर्मचार्‍यांनी ४ हजार ६०० लोकांशी संपर्क साधला आहे. कॉल सेंटरला चांगला प्रतिसाद मिळत आहे, ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त दंडाची रक्कम बाकी आहे त्यांना कॉल केले जात आहेत, असे वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितले. त्यामुळे आता दंड चुकवणा-यांना आता चांगलाच चाप बसणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here